ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागात वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना हा माझ्या दृष्टीने गंभीर विषय आहे. त्यामुळे भविष्यात महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली. सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुंड टोळ्यांचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विजय कांबळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या ठाणे पोलीस आयुक्तपदावर परमवीर सिंग यांची नियुक्ती झाली असून, मंगळवारी दुपारी परमवीर सिंग यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असून ते चांगल्याप्रकारे राखण्याचा प्रयत्न करणार आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर व्हावी म्हणून महिलांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे, असे सिंग यांनी सांगितले. ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना     
वाढीस लागल्या असतील तर हा विषय माझ्या दृष्टीने गंभीर आहे. यामुळे या गुन्ह्य़ांमध्ये सक्रिय असलेले गुन्हेगार किंवा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांना पायबंद बसावा म्हणून आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतील. मात्र प्रतिबंधकापेक्षा अशा गुन्हेगारांची उकल करण्यावर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कल्याण निवडणुकीचा योगायोग
ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे यापूर्वी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त होते. त्यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. यानंतर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त असतानाही त्यांच्या देखरेखीखाली या महापालिकेची निवडणूक झाली होती. आता काही महिन्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असतानाच परमवीर सिंग यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.