राजा तशी प्रजा. हे वर्षांनुवर्षांचे सूत्र. या सूत्रात थोडा बदल करून ‘दादा, भाई, ताई तशी प्रजा’ असे अलीकडच्या राजकारणातील सूत्र आहे. लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्यांचा कारभार सुरू होतो. आपण कोणाला निवडून देत आहोत, याचे भान अनेक वेळा पक्षीय, संघटनात्मक आणि संघीय कोशात अडकलेल्या मंडळींना राहत नाही. त्याचे दुष्परिणाम त्या शहराला विकास, नागरी समस्या, राजकीय उपद्रव अशा अनेक माध्यमांतून भोगावे लागतात.
कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीपुरते बोलायचे झाले तर, या भागातील बुद्धिजीवी, मध्यम, सामान्य वर्ग आपला नोकरी, व्यापार, व्यवसाय सांभाळून अंगणापुरते आटोपशीर राजकारण करीत वास्तव्य करीत आहे. कोणत्याही राजकीय भानगडीत थेट नसलेला हा वर्ग दर पाच वर्षांनी निवडणुकीसाठी एकदा पक्षीय रंग न दाखवता रस्त्यावर उतरतो. मतदान करतो. उमेदवार निवडून जातात. ते नगरसेवक, आमदार, खासदार होतात. बुद्धिजीवी, विचारी, सुसंस्कारी मतदाराने मतदान करताना शहरात विकास प्रकल्प कोणी राबविले, नागरी समस्या कोणी सोडविल्या, तळमळीने कोण लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे काम करील, अशांना मतदान करण्याऐवजी आपल्या संस्था, संघटना, ज्ञातीचे कार्यक्रम राबविणाऱ्या उत्सवी मंडळींना कशी आपुलकीने आर्थिक मदत केली. शिर्डीचे दर्शन फुकटची वाहने उपलब्ध करून कसे घडविले. सहलींचा खर्च कसा उचलला. वर्षांतून एकदा होणाऱ्या वर्धापनदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, हळदीकुंकू, टेबल टेनिस, क्रीडा स्पर्धा, खेळ कार्यक्रमाला कशी झाकून मुठीची मदत केली. ही गणिते मतदान करताना करतात.
पालिकेत नगरसेवक, विधानसभेत आमदार, लोकसभेत खासदार म्हणून पाठविलेल्या आपल्या दादा, भाईने पाच वर्षांत शहरात किती विकासकामांसाठी निधी आणला. किती कामे प्रामाणिकपणे ठेकेदारावर अंकुश ठेवून करून घेतली. वाहनतळ, रस्ते, उड्डाणपूल उभारण्यासाठी किती प्रयत्न केले.. यापैकी कशाचाही विचार न करता या शहरातील बुद्धिजीवी, मध्यमवर्गीय, सामान्य विचारी मतदार फक्त लोकप्रतिनिधीच्या प्रेमापोटी मतदान करतो. हाच विचारी मतदार पाच वर्षांत शहरातील बकालपणाविषयी तावातावाने बोटे मोडत, नाकावर रुमाल ठेवून रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत चडफडत जातो. पण आपण जो लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आहे, तो ही कामे का करीत नाही या विषयी जाब विचारण्याची हिंमत या बुद्धिजीवी, विचारी मतदारामध्ये नसते. वर्षांनुवर्षे कल्याण, डोंबिवली शहरात बुद्धिजीवी, झोपडीधारक त्यांच्या चौकटीत मतदान करीत आहेत. शहरे नागरी सुविधांअभावी वाळलेल्या खारकेसारखी खंगत चालली आहेत. मग या व्यवस्थेला जबाबदार कोण, याचा थोडा तरी विचार करा.