|| सायली रावराणे

हेल्पलाइनवरून प्रतिसादाऐवजी हतबलता; कारवाईऐवजी रेल्वे पोलिसांची टोलवाटोलवी

‘आम्ही मुंबई विभागाचे आहोत, तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर दूरध्वनी करा’, ‘आता मी तरी काय करू शकते? माफ करा मला या वेळी तुमची मदत करता येणार नाही’.. मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील एका लोकलमध्ये विनयभंगाचा भयाण अनुभव घेतलेल्या तरुणीने लोकलमधील हेल्पलाइनशी संपर्क केल्यानंतर तिला मिळालेली ही उत्तरे. कोपरखरणे रेल्वे स्थानकात गाडी थांबली असताना अचानक गाडीत शिरलेल्या एका अज्ञात तरुणाने केलेल्या गैरवर्तनाची तक्रार करण्यासाठी रेल्वे पोलीस ठाणे गाठल्यानंतरही या तरुणीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीच. उलट तक्रारदाराला या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात पाठवण्यापलीकडे पोलिसांनी धन्यता मानली.

ठाणे स्थानकातून सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी सुटणाऱ्या नेरुळ गाडीमधील पनवेल दिशेकडील प्रथम श्रेणीच्या महिला डब्यातून ही महिला प्रवास करत होती. भल्या सकाळची वेळ असल्याने प्रथम श्रेणी डब्यात कुणीच नव्हते. गाडी कोपरखरणे स्थानकात पोहोचली असताना अचानक एक व्यक्ती डब्यात शिरला. दरवाजाच्या दिशेला पाठ करून बसलेल्या महिलेला काही समजण्याच्या आत त्या विकृत इसमाने तिचा विनयभंग केला आणि गाडी फलाट सोडत असताना तो उतरून पसार झाला. हा प्रकार इतक्या वेगाने घडला की सदर महिलेला आरडाओरड करण्याचीही संधी मिळाली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या त्या महिलेने डब्यात लावलेल्या महिला तक्रार निवारण क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ‘आता आम्ही काय करू शकणार’, ‘तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधा’ अशी मासलेवाईक उत्तरे तिला मिळाली.

आपल्याशी घडलेला प्रकार अन्य महिला प्रवाशांच्याबाबतीत घडू शकतो, या विचाराने सदर महिलेले नेरुळ रेल्वे स्थानक गाठून तेथील लोहमार्ग ठाण्याकडे धाव घेतली. त्या वेळी पोलीस ठाण्यातील अधिकारी समोरच्या खुर्चीवर पाय लांब करून चहाची तलफ भागवत होते. महिलेने आपल्यावर गुदरलेला प्रसंग या अधिकाऱ्याकडे कथन केला. मात्र ते ऐकल्यानंतरही इकडचा पाय तिकडे न करता अधिकाऱ्याने तिला वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.

पोलिसांकडून मिळालेली ही वागणूक पाहून महिलेचे अवसान गळून गेले. मात्र तरीही तिने वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी सायंकाळी वाशी पोलिसांनी तिची तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास करताना सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, त्या विकृत इसमाने अशा प्रकारचे गैरवर्तन आधीही केल्याचे आढळून आले. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी राजश्री गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंबंधी ठोस माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.