अलगीकरण न करता थेट कामावर रुजू; तारापूर औद्योगिक परिसरात करोना पसरण्याची भीती

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : करोना संक्रमणामुळे मूळ गावी गेलेले परराज्यातील कामगार पुन्हा बोईसरमध्ये परतू लागले आहेत. रेल्वे गाडय़ा आणि खासगी वाहनांनी परतलेल्या या कामगारांकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. परतलेल्या कामगारांचे अलगीकरण करण्याऐवजी त्यांना थेट कामावर रुजू करून घेतले जात असल्याने तारापूर औद्योगिक परिसरात करोना संसर्ग पुन्हा उसळ घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

करोनाच्या भीतीमुळे परराज्यात आपल्या मूळ गावी गेलेला कामगार वर्ग पुन्हा बोईसर- तारापूरकडे परतला आहे. तारापूर औद्योगिक परिसरातील अनेक उद्योगसंस्था सुरू झाल्याने कामगार पुन्हा या ठिकाणी आले आहेत. अनेक कामगार रेल्वेगाडय़ांनी बोईसर रेल्वे स्थानकात उतरताना दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, गुजरात व राजस्थानच्या परिवहन विभागाचा परवाना असलेल्या वाहनांमधून कामगारांची लोंढे पुन्हा बोईसरकडे येऊ  लागल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे ही वाहने सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान बोईसरमध्ये दाखल होत असल्याने याच वेळी इतर भागातून येणाऱ्या कामगारांच्या सोबतीने ते औद्य्ोगिक परिसरात सहजत दाखल होताना दिसतात. परराज्यातून येणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत नसल्याचे तसेच नाक्यावरील पोलिसांकडून ढिलाई होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

करोनाबाधित वाढण्याची भीती

परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचे पंधरा दिवसांसाठी अलगीकरण करणे आवश्यक आहे. मात्र अशा कामगारांची माहिती आरोग्य विभाग व महसूल विभागाला दिली जात नसल्याने तसेच या कामगारांना थेट कंपन्यांच्या आवारामध्ये उतरवून घेतले असल्याने त्यांच्या नोंदी कुठेही होत नाही. एकीकडे ग्रामीण भागातील करोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात असताना परराज्यातून बेसुमारपणे  येऊ  लागलेल्या कामगार वर्गाकडे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने करोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.