साटेलोटय़ाच्या राजकारणासाठी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते बेकायदा बांधकामांमुळे अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेवकाच्या मदतीसाठी धावून गेल्याचे चित्र पुढे आले आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताला श्रीमुखात भडकविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर साळवी यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव गुंडाळल्यानंतर आता दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्तावही सत्ताधारी शिवसेनेने फेटाळून लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे महापालिकेतील सर्वपक्षीय मांडवली राजकारणाचे अनेक किस्से यापूर्वीही चर्चेत आले आहेत. बेकायदा बांधकामांमध्ये सहभागी असणे, अधिकाऱ्यांना धमकाविणे, महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग दाखविल्याप्रकरणी महापालिकेतील तब्बल दहा नगरसेवकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांचाही समावेश असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे महेश वाघ, पूजा वाघ, दशरथ पालांडे यासारख्या नगरसेवकांवरही पद रद्द होण्याची टांगती तलवार अद्याप कायम आहे. मध्यंतरी कळव्यात एका बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या श्रीमुखात भडकविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर साळवी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आधारे साळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव फेटाळावा यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. नेमका असाच प्रकार मनसेच्या एका नगरसेवकाबाबत आढळून आला असून, बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या या नगरसेवकाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे केल्याचे स्पष्ट होत आहे.
शैलेश पाटील यांचा वादग्रस्त कारभार
दिव्यातील सुभद्राबाई कॉलनी, आई निवास आणि जयभवानी या चाळीचे बांधकाम बेकायदा असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडे नोंद आहे. ही बांधकामे शैलेश पाटील यांनी केल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या एका सर्वेक्षणातून पुढे आली. शिवसेनेचे दिव्यातील माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी याप्रकरणी तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे तक्रार दाखल केली असता त्यांनी सविस्तर सुनावणी घेतली. सुनावणीनंतर या चाळीची मालकी शैलेश पाटील यांची असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या मुंब्रा समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालातही पाटील यांच्याविरोधात ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे प्रकरण न्यायालयाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असती तर न्यायालयात सुनावणी होऊन पाटील यांचे पद धोक्यात आले असते.  मात्र कोणतेही ठोस कारण न देता सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  
जयेश सामंत, ठाणे