कल्याणमधील धक्कादायक प्रकार; तिघांना अटक

मुलगा शाळेच्या बसमधून उतरला. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरात आला नाही आणि अचानक त्याच्या आई-वडिलांना खंडणीसाठी धमकावणारे दूरध्वनी येऊ लागले. हादरलेल्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्रभर शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेहच हाती लागला.. ही धक्कादायक घटना गुरुवारी कल्याणमध्ये उघडकीस आली. गांधी चौकात राहणाऱ्या जैन कुटुंबियांवर दुखाचा डोंगरच कोसळला.

नयन जैन या सात वर्षीय चिमुरडय़ाची अपहरणकर्त्यांनी निर्घृण हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आली. गांधी चौकातील गजानन टॉवर येथे राहणारे संतोष जैन कपडय़ाचे व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानात काम करणारे राजेंद्र मोरे, विजय दुबे आणि कुशवाह या तिघांनीही वर्षभरापूर्वीच त्यांच्याकडील काम सोडून दिले होते. या तिघांनीच बुधवारी नयनचे अपहरण केले. त्याच्या सुटकेसाठी १५ लाख रुपयांची खंडणी संतोष जैन यांच्याकडे मागितली. खंडणीची बॅग टिटवाळा आणि आंबिवली या स्थानकांदरम्यान टाकण्याची सूचना अपहरणकर्त्यांनी जैन यांना केली. जैन यांनी लगोलग या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तातडीने सापळा रचला. जैन यांनी लोकलमधून पैशाची बॅग टाकताच अपहरणकर्ते मोटारसायकलने पसार झाले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत मोरे आणि कुशवाह यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तिसरा साथीदार दुबे यालाही पोलिसांनी अटक केली. नयनची हत्या करून या तिघांनीही त्याचा मृतदेह  मुरबाड तालुक्यातील खाटेघर नदीत फेकून दिला होता.

बिंग फुटेल म्हणून..

कल्याणातील सॅक्रेड हार्ट या शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा नयन राजेंद्र, विजय व कुशवाह या तिघांनाही ओळखत होता. त्याची सुटका केल्यास आपले बिंग फुटेल या भीतीने या तीनही नराधमांनी बुधवारी रात्रीच नयनला झोपेची गोळी दिली व झोपेतच गळा आवळून त्याची हत्या केली. नयनचे अपहरण करण्यासाठी या तिघांनीही संतोष जैन यांचीच मोटारसायकल चोरली होती.

कल्याण परिसरातील अपहरणाच्या घटना

  • २५ जुलै २००९ रोजी डोंबिवलीतील यश शहा या ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या
  • २ फेब्रुवारी २०१० रोजी तुषार सोनी (१२) या विद्यार्थ्यांचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले. त्याची हत्या झाली.
  • १७ एप्रिल २०१४ कल्याणमधील रोहन गुचेत या १२ वर्षीय विद्यार्थ्यांचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण व हत्या