जुगार, दारू आणि अमली पदार्थाविरोधात जोरदार कारवाई

पालघर जिल्ह्य़ात बेकायदा दारूचे अड्डे, अमली पदार्थाची विक्री आणि जुगाराविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या चार महिन्यांत बेकायदा दारू विक्रीच्या विरोधात पोलिसांनी ३१३ गुन्हे दाखल केले आहेत, तर जुगाराविरोधात २० आणि अमली पदार्थाचा व्यावहार करणाऱ्यांविरोधात २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये तब्बल ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणावर दारू, जुगारांचा तसेच अमली पदार्थाचा व्यवहार चालतो. त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालघर पोलिसांनी कंबर कसली आहे. एकाच वेळी जिल्ह्य़ातील सर्व पोलीस ठाण्यांना या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या कारवाईला वेग आला आहे.

जिल्ह्यत जागोजागी हातभट्टीची बेकायदा गावठी दारू तयार केली जाते. ही दारू चोरटय़ा मार्गाने जिल्ह्यत तसेच जिल्ह्याबाहेर पोहोचवली जाते. त्यामुळे दारूच्या अड्डय़ांवर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. १ जानेवारी ते १३ मे या सव्वा चार महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी बेकायदा दारूविरोधात ३१३ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात २५८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जुगार अड्डय़ांवर छापे

दारूबरोबरच पोलिसांनी अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर आणि जुगार अड्डय़ांवर छापे मारण्यास सुरुवात केली आहे. अमली पदार्थाची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात १ जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांत २२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १५ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत चालणाऱ्या जुगारांच्या अड्डय़ावरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. १ जानेवारी ते १३ मे या कालावधीत पोलिसांनी जुगाराचे २० अड्डे उद्ध्वस्त केले असून १००हून अधिक आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षकांचे आदेश

जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी असून प्रत्येकाला दररोज अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिले आहे. या कारवाईमुळे जुगार, अमली पदार्थ आणि बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बारमधील छुप्या दालनांवर हातोडा

  • पोलिसांच्या तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई; भाजप नगरसेवकाच्या बारचा समावेश

अनैतिक व्यवसायासाठी आणलेल्या बारबालांना लपवण्यासाठी बारमध्ये निर्माण करण्यात आलेल्या छुप्या दालनांवर मंगळवारी मीरा-भाईंदर महापालिकेने हातोडा चालवला. भाईंदर पूर्व येथील ‘अण्णा पॅलेस’ आणि ‘प्राइम’ या दोन बारमध्ये ही छुपी दालने तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे यातील ‘अण्णा पॅलेस’ हा बार भाजपचे नगरसेवक गणेश शेट्टी यांचा असून सध्या तो त्यांनी दुसऱ्याला चालवायला दिला आहे. नवघर पोलिसांनी या संदर्भात मीरा-भाईंदर महापालिकेकडे तक्रार नोंदवली होती.

‘ऑकेस्ट्रा बार’च्या नावाखाली बारमधून अश्लील कृत्ये केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. बारमध्ये परवानगीपेक्षा जास्त बारबाला ठेवून त्यांच्याकडून ही अनैतिक कृत्ये बारमालक करवून घेत असतात. पोलिसांनी छापा टाकल्यास बारबालांना बारमध्येच तयार करण्यात आलेल्या छुप्या दालनांमध्ये दडवून ठेवण्यात येते. ही दालने इतकी चिंचोळी असतात की त्यात बारबालांना अक्षरश: दाटीवाटीने कोंबून ठेवण्यात येते. अनेक वेळा बारबालांना त्यात गुदमरायलाही होत असते. ही दालने बारमध्ये इतक्या बेमालूमपणे तयार केली जातात की बाहेरून आतमध्ये दालन असल्याचा संशयदेखील येत नाही.

काही दिवसांपूर्वीच नवघर पोलिसांनी भाईंदर पूर्व येथील अण्णा पॅलेस बारवर छापा टाकून तेथे सुरू असलेल्या अश्लील कृत्यांवर कारवाई केली होती. त्या वेळी या ठिकाणी छुपी दालने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

ही दालने अनधिकृतपणे बांधण्यात आली असल्याने नवघर पोलिसांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकडे तक्रार नोंदवून छुप्या दालनांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुनील यादव, गोविंद परब, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या पथकाने अण्णा पॅलेसमध्ये बांधण्यात आलेली तीन छुपी दालने उद्ध्वस्त केली. त्यानंतर याच भागातील प्राइम या बारमध्येही बांधण्यात आलेल्या छुप्या दालनांवर कारवाई करण्यात आली. बारमालकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

अण्णा पॅलेस हा बारअनैतिक कृत्यांसाठी अतिशय कुप्रसिद्ध आहे. भाजपचे विद्यमान नगरसेवक गणेश शेट्टी यांच्या नावे या बारचा परवाना आहे, परंतु सध्या तो त्यांनी दुसऱ्याला चालवण्यासाठी दिला आहे.  बारमधील छुप्या दालनांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे.

अतुल कुलकर्णी, साहाय्यक पोलीस अधीक्षक