04 July 2020

News Flash

बेकायदा चाळींसाठी तिवरांची कत्तल!

चाळी बांधण्यासाठी बाह्य़वळण रस्ता, तलावाच्या आरक्षित जागांचा वापर करण्यात येत आहे.

तिवरांच्या झाडांवर रसायन टाकून वाळल्यानंतर आग लावली जात आहे.  

रसायन टाकून झाडे मारण्याचे प्रकार; पाणी टंचाईतही बेकायदा बांधकामांना मुबलक पाणी

डोंबिवली पूर्व भागातील आयरे, भोपर भागातील मोकळ्या जमिनीचा पट्टा बेकायदा चाळी बांधून भूमाफियांनी संपुष्टात आणला आहे. आता चाळी उभारण्यासाठी मोकळी जागा नसल्याने भूमाफियांनी तिवरांची मोठी झाडे कत्तल करून त्या ठिकाणी चाळी बांधण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहरात पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी पाणी मिळणे मुश्कील झाले असताना, आयरे, भोपर भागांत उभारण्यात येणाऱ्या बेकायदा चाळींना मात्र पालिकेच्या जलवाहिन्या, टँकरद्वारे मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चाळी बांधण्यासाठी बाह्य़वळण रस्ता, तलावाच्या आरक्षित जागांचा वापर करण्यात येत आहे. आयरे, भोपर, कोपर पूर्व भागातील ‘सागरी किनारा नियमन’ (सी. आर. झेड) क्षेत्रात खाडी किनारी गेल्या तीन ते चार वर्षांत हजारो बेकायदा चाळी भूमाफियांनी उभारल्या आहेत. या भूमाफियांना काही लोकप्रतिनिधींचा पडद्यामागून पाठिंबा आहे. त्यामुळे पालिका अधिकारी या बेकायदा चाळींवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. कोणी या चाळींविषयी तक्रार केली की, पालिका अधिकारी संबंधित लोकप्रतिनिधीला त्या तक्रारदाराचे नाव, पत्ता कळवून त्याचा परस्पर बंदोबस्त करण्यास भाग पाडतात. असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून ‘ग’ प्रभागाच्या अंतर्गत सुरू आहेत.

आयुक्त ई. रवींद्रन यांनी आयरे पट्टय़ातील बेकायदा चाळी जमीनदोस्त कराव्यात म्हणून अनेकदा ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्तांनी झाडाझडती घेतली की तेवढय़ा वेळेपुरती फक्त तोंडदेखली कारवाई प्रभाग अधिकाऱ्याकडून कारवाई केली जाते. कल्याण-डोंबिवली शहरात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती आहे. इमारती, चाळी, झोपडपट्टय़ांमधील रहिवासी पाण्यासाठी वणवण फिरत असताना, आयरेगाव भागात मात्र बेकायदा चाळी बांधण्यासाठी भूमाफियांना मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. पालिकेच्या मुख्य जलवाहिन्या फोडून त्यावर चोरीची नळ जोडणी घेऊन हे माफिया बांधकामासाठी पाणी वापरतात. चाळी उभारून झाल्या की, त्या ठिकाणी पालिकेच्या जलवाहिनीवरून चोरीच्या नळ जोडण्या घेतल्या जातात. या जलवाहिन्या पालिका अभियंत्यांकडे तक्रारी करूनही तोडल्या जात नाहीत, असे आयरे भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

या बेकायदा बांधकामांविषयी उघडपणे बोलले तर भूमाफियांकडून त्रास होण्याची भीती असल्याने या गंभीर विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाही. यामुळे या गंभीर प्रश्नाकडे आयुक्तांनी लक्ष घालावे. अतिक्रमणांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

आयुक्तांकडे तक्रार

आयरे भागातून पालिकेचा बाह्य़वळण रस्ता गेला आहे. आता या रस्त्याच्या अवतीभोवती माफियांनी बेकायदा चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे. या चाळी उभारण्यासाठी तिवरांची झाडे तोडण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळेत या झाडांवर रसायन टाकून ती झाडे मारुन टाकली जातात. झाडे वाळल्यानंतर त्याला आगी लावल्या जाऊन जागा मोकळी व सपाट करण्यात येते. या मोकळ्या जागा बेकायदा चाळी बांधण्यासाठी वापरल्या जात आहेत. आयरेगाव, कोपर पूर्व, भोपर पट्टय़ात तिवरांचे पन्नास ते साठ एकर जमिनीवर घनदाट जंगल होते. हे सगळे जंगल माफियांनी नष्ट करुन टाकले आहे. आयरे गावात तलावाचा सहा एकरचा पट्टा आहे. हा बहुतांशी पट्टा चाळी बांधून गिळंकृत करण्यात आला आहे. या प्रकरणाची आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्या कारवाईची वाट पाहत असल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2016 2:02 am

Web Title: tree cut in illegal chawal
Next Stories
1 पाच अट्टल सोनसाखळी चोरांना ठाण्यात अटक
2 निर्णय केंद्रीकरणाचा प्रयत्न अर्थसुधारणांना मारक
3 रुग्णवाहिकांसाठी ठाण्यात खास थांबे
Just Now!
X