ठाणे : येथील नौपाडा भागातील संत गजानन महाराज चौकाजवळ महापालिकेने दहा वर्षांपूर्वी वारकरी भवनाची उभारणी केली होती. परंतु या वास्तुचा ताबा मिळत नसल्यामुळे वारकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. अखेर महापालिकेने मंगळवारी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी भवनाचे लोकापर्ण केले. यामुळे दहा वर्षांनंतर वारकऱ्यांना हक्काचे वारकरी भवन मिळाले आहे.

ठाणे येथील नौपाडा भागातील संत गजानन महाराज चौकात महापालिकेने वारकरी भवनाची इमारत उभारली आहे. ठाण्याचे खा. राजन विचारे यांच्या संकल्पनेतून हे वारकरी भवन उभारण्यात आले आहे. या इमारतीच्या कामाचे भुमीपुजन २००७ मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. तीन वर्षांत इमारत उभारणीचे काम पुर्ण झाले होते. या इमारतीचा लोकार्पण सोहळा १९ डिसेंबर २०११ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. परंतु शहर विकास विभागाला या इमारतीचा ताबा मिळत नव्हता. यामुळे उद्घाटनानंतरही ही इमारत धुळखात पडली होती. काही वर्षांनंतर शहर विकास विभागाला इमारतीचा ताबा मिळाला. तरीही वारकरी भवन सुरु होऊ शकलेले नव्हते. हे भवन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांकडून होत होती. या मागणीनंतर वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजला ठाणे ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती, दुसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आणि तिसरा मजला अ. भा. मराठी नाटय़ परिषद ठाणे शाखा या संस्थांना देण्याचा निर्णय महापालिकेने २० ऑक्टोबर २०१६ रोजी घेतला होता. परंतु ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाची इमारती धोकादायक झाल्याने न्यायालयीन कामकाजासाठी महानगरपालिकेने वारकरी भवनाची इमारत ६ ते ८ महिन्यांच्या मुदतीवर न्यायालयाला २०१७ मध्ये दिली होती. वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजल्यावर न्यायालीन दस्तावेज ठेवल्याने पहिल्या मजल्याचा ताबा मिळेपर्यंत तळमजला आणि तिसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, दुसरा मजला ठाणे ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद ठाणे शाखा यांना गडकरी रंगायतन येथे तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची ताबा पावती देण्यात आली आहे. दरम्यान, खा. विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, ठाणे ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती आणि अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश जोशी यांची भेट घेतली होती. त्यावेळेस वारकरी भवनातील पहिल्या मजल्यावरील जागा लवकरात लवकर रिकामी करू असे आश्वासन त्यांनी दिले होते. या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केल्यानंतर मंगळवारी वारकरी भवनाचे लोकार्पण करण्यात आले.

pm modi in mamata banerjee turf
पंतप्रधान मोदी तीन वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या राज्यात, संदेशखाली प्रकरणावर बोलणार?
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात
Kalyan Dombivli, municipal corporation, Tree Census, 7 Lakh Trees, Reveals,
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सात लाखाहून अधिक वृक्ष, दोन हजार ६५० वारसा वृक्षांचा समावेश