ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गापर्यंतचा प्रवास हा जीवघेणा आणि मृत्यूच्या सापळ्या प्रमाणे ठरत आहे. मागील १५ महिन्यांत म्हणजेच, १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार रुळ ओलांडताना आणि रेल्वेमधून खाली पडून ६६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील इतर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपघातांपेक्षा हे अपघात अधिक आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरून बदलापूर पासून कसाऱ्या पर्यंत लाखो प्रवासी दररोज नोकरी किंवा व्यवसायानिमित्ताने मुंबईच्या दिशेने येत असतात. मुंबई गाठण्यासाठी पुरेशी रस्ते सेवा सुविधा नसल्याने नागरिकांना रेल्वे शिवाय पर्याय नाही. रेल्वेचे अद्याप अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. तसेच अनेकदा प्रवाशांकडूनही रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार घडत असतात. तसेच रेल्वे गाड्यांतून पडल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील पोलीस ठाण्यात अपघातातील जखमी आणि मृतांची आकडेवारी नोंद होत असते. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली ही रेल्वे स्थानके येतात. तर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली, भिवंडी, खारबाव, कामनरोड आणि जुचंद्र ही रेल्वे स्थानके येतात. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा ही रेल्वे स्थानके येतात. या रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील अपघात संबंधित पोलीस ठाण्यात नोंद होते. या आकडेवारीनुसार, मागील १५ महिन्यांत ६६३ जणांचा ठाणे ते कसारा आणि ठाणे ते बदलापूर या मार्गावर अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ३९१ जणांना प्राण गमवावा लागला आहे. तर २७२ जणांचा धावत्या रेल्वेगाडीतून पडून मृत्यू झाला आहेत.

या अपघातांच्या बळींमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४० पुरुषांचा मृत्यू झाला. तर ११ महिलांचा मृत्यू झाला. डोंबिवलीत ५१ पुरुष आणि तीन महिला तर, कल्याणमध्ये ९१ पुरुष आणि तीन महिलांचा सामावेश आहे.

अपघात कुठे किती

– १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ (मृत्यू )

पोलीस ठाणे – रेल्वे रुळ ओलांडणे- धावत्या रेल्वेतून पडून

ठाणे – १५१- ६८

डोंबिवली- ५४- ३९

कल्याण – १०४- ११६

– १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ (मृत्यू)

पोलीस ठाणे – रेल्वे रुळ ओलांडणे- धावत्या रेल्वेतून पडून

ठाणे – ४४- १४

डोंबिवली- १४- ०७

कल्याण – २४- २८

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाता बाबत प्रवाशांना वारंवार जनजागृती करुनही रेल्वे रुळ ओलांडणे सुरू आहे. त्यामुळे नाहक बळी जात आहेत. तर धावत्या रेल्वेतून पडण्याचे प्रवाशांचे प्रमाण किंवा इतर अपघातांच्या घटनांमध्ये कमतरता आली आहे. – डाॅ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे