scorecardresearch

कल्याण: शहापूर तहसीलदारांसाठी लाच मागणाऱ्या शिपाई, मध्यस्थांवर गुन्हा दाखल

एक शेतकऱ्याचे एक प्रकरण शहापूर तहसीलदार कार्यालयात प्रलंबित आहे. याप्रकरणाच्या सुनावण्या झाल्या आहेत.

कल्याण: शहापूर तहसीलदारांसाठी लाच मागणाऱ्या शिपाई, मध्यस्थांवर गुन्हा दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

जमीन व्यवहारातील एका प्रकरणाचा निकाल देण्यासाठी शेतकऱ्याकडे शहापूरच्या तहसीलदारांच्या नावाने स्वतंत्रपणे अडीच लाख आणि तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे तहसीलदार कार्यालयातील एक शिपाई आणि एक खासगी इसम यांच्या विरुध्द लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मिलिंद नारायण राऊत (शिपाई), ओंकार एकनाथ पातकर (खासगी इसम) अशी आरोपींची नावे आहेत. एक शेतकऱ्याचे एक प्रकरण शहापूर (जि.ठाणे) तहसीलदार कार्यालयात प्रलंबित आहे. याप्रकरणाच्या सुनावण्या झाल्या आहेत. या प्रकरणात आई, मामा आणि मावशी यांच्या बाजुने शहापूर तहसीलदार यांनी निर्णय द्यावा आणि त्या निर्णयाची प्रत देण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील शिपाई मिलिंद राऊत यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे दोन लाख ५० हजार रुपये आणि खासगी इसम ओंकार पातकर याने तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असे कारवाई पथकाच्या तक्रारीत म्हटले आहे. कार्यालयात होत असलेल्या घडामोडींसाठी राऊत, पातकर हे तहसीलदार कार्यालया बाहेर काही तडजोडी करत असल्याच्या तक्रारी आता शेतकरी करू लागले आहेत.

हेही वाचा : ठाणे: आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानाप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आपण एवढी रक्कम देऊ शकत नाही. तरीही प्रकरण मार्गी लावण्यासाठी आपण तुम्हाला खूष करू असे तक्रारदाराने दोन्ही आरोपी इसमांना सांगितले होते. मागणीची रक्कम दिल्या शिवाय काम होणार नाही, असे दोन्ही आरोपी इसम तक्रारदाराला सांगत होते. अखरे तक्रारदार शेतकऱ्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. तक्रारदार आणि आरोपी इसम यांच्या संभाषणात ते शहापूर तहसीलदार यांच्यासाठी लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस उप अधीक्षक प्रमोद जाधव यांनी शुक्रवारी राऊत, पातकर यांच्या विरुध्द शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

हेही वाचा : ठाणे: आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानाप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, शहापूर तहसीलदार कार्यालयात अकृषिक, जमीन विषयक प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात रकमांची मागणी शिपाई, खासगी मध्यस्थ करत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. दगडखाण मालक तहसीलदार कार्यालयातील काही मध्यमस्थांकडून होणाऱ्या उपद्रवाने हैराण आहेत. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भिवंडीचे दोन प्रांत अलीकडेच जमीन मोबदला प्रकरणात निलंबित झाले. यावरुन जिल्ह्यातील महसूल विभागात अराजकतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे. येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय काही आमदारांकडून उपस्थित केला जाणार आहे. काही शेतकऱ्यांच्या दोन वर्षापासूनच्या एन.ए.च्या नस्ती ठाणे महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी रोखून धरल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 17:41 IST

संबंधित बातम्या