ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने मागील आठवड्यात नवी मुंबई येथील एका संस्थेविरोधात बेकायदेशीररित्या चर्चमध्ये आश्रमशाळा चालविल्या प्रकरणी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांची मागील आठ दिवसांपासून बाल कल्याण समिती तर्फे चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान एका १४ वर्षीय मुलीने संस्थाचालक मागील काही महिन्यापासून तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांजवळ केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तक्रारीच्या आधारे जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि पोलीस प्रशासनाने सबंधित संस्थाचालका विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारी नंतर या बेकायदेशीर चर्च आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसून येत आहे.

प्रकरण काय होते ?
नवी मुंबई येथील सी वूड परिसरात एक चर्च आहे. या चर्चमध्ये परिसरातील नागरिक प्रार्थनेसाठी देखील येतात. या ठिकाणी बेघर वयोवृद्ध, मतिमंद नागरिकांबरोबरच अल्पवयीन मुलांचा मागील काही वर्षांपासून सांभाळ केला जात आहे. परंतु, मागील काही दिवसात या ठिकाणी लहान मुलांची संख्या वाढत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकारी वर्गाने ५ ऑगस्ट रोजी चर्चला अचानक भेट दिली. यावेळी केवळ तीन लहान खोल्यांमध्ये ४५ अल्पवयीन मुले तसेच इतर बेघर आणि मतिमंद वयोवृद्ध नागरिक अत्यंत अस्वच्छ स्थितीत राहत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. संबंधित चर्च चालविणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट या नावे २००६ साली संस्था नोंदणीकृत असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याबाबतची कोणतीही कागदपत्रे त्याला सादर करता आली नाही. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सर्व मुलांची रवानगी उल्हासनगर आणि नेरूळ येथील शासकीय बालगृहात केली होती.

मुलीची तक्रार काय आहे ?
सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांची मागील आठ दिवसांपासून बालकल्याण समिती तर्फे चौकशी सुरू आहे. या दरम्यान मुळची तामिळनाडूची असलेल्या आणि सध्या मुंबई येथील धारावी मध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने संस्था चालक मागील काही महिन्यांपासून तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यानं जवळ केली आहे. तसेच तक्रार कोणाकडे करायची म्हणून घाबरलेल्या परिस्थितीत तिने इतके दिवस या प्रकरणाची वाच्यता केली नाही. या संबंधी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन गंभीर झाले असून संबंधित संस्थाचालका विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली आहे. सदर मुलीला वडील नसून आई तिचा सांभाळ करत होती. मात्र घरची परिस्थीत बेताची असल्याने त्या मुलीची रवानगी या आश्रमशाळेत करण्यात आली होती.

अजूनही गैर प्रकार बाहेर येण्याची शक्यता
या आश्रम शाळेतून सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांमध्ये १३ मुलींचा समावेश होता. या मुलींबरोबर देखील अशाच पद्धतीचे काही प्रकार झाले आहेत का ? या आधी येथे किती मुली राहत होत्या ? त्यांच्या सोबत अशा पद्धतीने काही कृत्य केले आहे का ? तसेच या मुली नक्की आल्या कुठून ? या त्यांच्या पालकांच्या समंतीने आल्या आहेत का ? या बाबत देखील आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अधिक चौकशी करत आहे.