एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याला कापूरबावडी पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचे चित्रीकरणही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेनंतर सराफा व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असून घोडबंदर रोड ज्वेलर्स असोसिएशन या संघटनेने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनाही पत्र पाठविले असून पिंपळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पिंपळे यांच्यावर करवाई झाली नाहीतर बंदचा इशाराही संघटनेने आहे. संशयित म्हणून अशाप्रकारे नागरिकांना मारहाण पोलीस कशी करू शकतात, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासा दरम्यान हा प्रकार अनवधानाने झाल्याचे सांगत पोलिसांकडून याप्रकरणाची सारवासारव केली जात आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील टिळकनगर बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांची भाजी मंडई

घोडबंदर येथील आझादनगर भागात एका व्यक्तीच्या घरातील सोन्याचे दागिने तिच्या मुलीने मित्राच्या मदतीने चोरी केले होते. याप्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता त्याने ते सोने ब्रम्हांड येथील एका सराफाला विकल्याची कबूली दिली. त्यामुळे ७ जानेवारीला कापूरबावडी पोलीस पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्यासह पाच ते सहा कर्मचारी साध्या वेशात त्या सराफाच्या दुकानात शिरले. त्यावेळी चौकशी दरम्यान, पिंपळे यांनी दुकानातील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता तो मुलगा त्या सराफाच्या दुकानात आला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस कर्मचारी सराफाच्या दुकानातून निघून गेले. दरम्यान, कर्मचाऱ्याला मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर घोडबंदर येथील घोडबंदर रोड ज्वेलर्स असोसिएशन संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री नको; जिल्हा प्रशासनाचे आदेश

संघटनेने पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये त्यांनी पिंपळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पिंपळे हे त्यांच्या पथकासह साध्या वेशात दुकानात शिरले. त्यानंतर कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी दुसरा एक कर्मचारी त्याठिकाणी आल्यानंतर त्यालाही शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या मुलाकडून आपण सोने खरेदी केले नसल्याचे कर्मचारी सांगू लागल्यानंतर पिंपळे यांनी त्यांचा गळा पकडून मारत दुकानाबाहेर नेले. बाहेर नेल्यानंतरही त्याला बेदम मारहाण केल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी संघटनेने याप्रकरणासंदर्भात एक बैठक घेतली. तसेच पिंपळे यांच्यावर कारवाई झाली नाहीतर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

याप्रकरणाचा तपास सुरू असताना अनवधानाने हा प्रकार घडला आहे. यामध्ये त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा कोणताही उद्देश नव्हता.- नीलेश सोनवणे, साहाय्यक पोलीस आयुक्त.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधिकारी पिंपळे यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्हाला न्याय मिळायला हवा. अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाहीतर बंद पुकारला जाईल. – पंकज जैन, अध्यक्ष, घोडबंदर रोड ज्वेलर्स असोसिएशन.