कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावातील एका संशोधकाने भूजल पातळी, भूस्तर शोधण्याचे सयंत्र तयार केले आहे. या सयंत्राच्या माध्यमातून जमिनीखालील पाण्याची पातळी, भूस्तराचे प्रकार, जलसाठे यांचा शोध घेणे शक्य होणार आहे. भारतीय बनावटीचे हे तंत्रज्ञान देशभर पसरविण्याचा या संशोधकाचा मानस आहे.

हेमंत यशवंत परदेशी (४०) असे हे सयंत्र शोधणाऱ्या संशोधकाचे नाव आहे. ते भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक आहेत. या विषयात त्यांनी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. खेड्यात राहून या तरूण संशोधकाने हे सयंत्र आपल्या कल्पकतेमधून तयार केल्याने परिसरातील शेतकरी, नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

पूर्वी गाव, खेड्यात विहिर खोदायची असेल, कुपनलिका लावायची असली की गावातील जाणकार ग्रामस्थाच्या सूचनेचा विचार केला जात होता. काही ग्रामस्थ आपल्या पूर्वपरंपार प्रथेप्रमाणे हातात शेंडी असलेला नारळ घेऊन कुपनलिका लावायची आहे, विहिर खोदायची आहे त्या भागात फिरत असत. जमिनीखाली पाणी असेल त्या भागात हातात असलेला नारळ अचानक शेंडीच्या दिशेने हातात उभ्या रेषेत स्थिर होतो, असे जुनेजाणते सांगतात. आताही आदिवासी, ग्रामीण गावखेड्यात ही पध्दत वापरली जाते. अंधश्रध्देसारखी असलेल्या या प्रथेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या पध्दतीवर शक्यतो कोणी विश्वास ठेवत नाही.

उद्योजक, शेतकऱ्यांंसह विविध भागातील नागरिकांना कोणत्याही पारंपारिक प्रथांचा अवलंब न करता यांत्रिक पध्दतीने भूजल पातळी शोधता यावी यासाठी आपण काही करावे, या विचारातून हेमंत परदेशी यांनी विचारपूर्वक या भूजल पातळी शोध सयंत्राची बांधणी केली आहे. भारतीय यांत्रिक सुट्टे भाग यांचा वापर करून कमी खर्चात या सयंत्राची परदेशी यांनी बांधणी केली आहे. यापूर्वी पारंपारिक प्रथांचा अवलंब करून शेतकऱ्यांनी विहिरी, कुपनलिका खोदल्या. पण त्या ठिकाणी पाणी न लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

जमिनी खालील पाण्याची पातळी, साठे शोधणारी इलेक्ट्रिकल रेसिस्टिव्हिटी तंत्रज्ञान, व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साऊंडिंग सारखी प्रगत तंत्रज्ञान विकसित आहेत. परंतु, परदेशी बनावटीची ही तंत्रज्ञाने खूप महाग आहेत. या यंत्रांमधील विद्युत प्रवाहांच्या साहाय्याने जमिनीखालील विविध थर, पाण्याचे झरे, साठे यांची अचूक माहिती मिळते. या यांत्रिकतेसाठी सुमारे १५ लाख रूपये मोजावे लागतात, असे परदेशी यांनी सांगितले. आपल्या भूजल सयंंत्रामुळे भूगर्भाची रचना, भूजल पातळी, पाणी साठे, कुपनलिका, विहिर खोदण्यासाठी कोणत्या जागेची निवड करावी याची अचूक माहिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान कमी खर्चिक आहे, असे संशोधक परदेशी यांनी सांगितले.

स्वदेशी बनावटीने तयार केलेले आपले भूजल सयंत्र तंत्रज्ञान भारतभर पसरेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या सयंत्राचे स्वामीत्व हक्क मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शेतकरी, उद्योजक, सर्व स्तरातील नागरिकांना या भूजल शोध सयंत्राचा लाभ झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.- हेमंत परदेशी संशोधक.