डोंबिवली : दारु विक्रेत्याजवळ चुगली केली म्हणून डोंबिवली जवळील सोनारपाडा गावातील दोन इसमांनी याच गावातील एक रहिवाशाला रात्रीच्या वेळेत लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन ठार केले. त्याने आत्महत्या केली हे दाखविण्यासाठी इमारतीच्या मागील खिडकीतून मयताला बाहेर फेकल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
या प्रकाराने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. राजेश रामवृक्ष सहाने उर्फ केवट (३८, रा. तिवारी टोला, भटन ददन,देवारिया, उत्तरप्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. मयताला अतीशय क्रूर पध्दतीने ठार मारलेल्या आरोपींची नावे दादु मटु जाधव उर्फ पाटील (४५, रा. साईश्रध्दा इमारत, गावदेवी मंदिरा समोर, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व), विनोद पडवळ (सोनारपाडा) अशी आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा मारहाणीचा प्रकार आरोपींनी केला.
पोलिसांनी सांगितले, मयत राजेश याने या भागातील एका दारु विक्रेत्याला हल्लेखोरांची चुगली केली होती. त्याचा राग आरोपींना आला होता. आरोपींनी मयत राजेश सहाने याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मध्यरात्री सोनारपाडा येथील साईश्रध्दा इमारतीमध्ये आरोपींनी राजेशला बोलावून घेतले. तेथे त्याच्याशी तू दारु विक्रेत्याला आमची चुगली का केली, असा जाब विचारला. याविषयावरुन त्याच्याशी वाद घालून त्याला लाकडी दांडक्याने खोलीमध्ये कोंडून मारहाण केली. आरोपी दादु पाटील, विनोद यांनी मयताच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केले. मयताने बचावासाठी खूप प्रयत्न केले. त्याला त्याने बाहेर पडण्याची संधी दिली नाही. या मारहाणीत राजेश केवटचा जागीच मृत्यू झाला.
राजेशच्या मृत्यूचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर फेकले. त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. इमारतीच्या खाली रक्त पडल्याने ते आरोपींनी पुसून काढले. सकाळी सहा वाजता साई श्रध्दा इमारतीच्या खाली एक इसम जखमी अवस्थेत पडल्याचे रहिवाशांना दिसले. तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे घटनास्थळी दाखल झाले. तपासणीत राजेशचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांनी तात्काळ तपास सुरू काही वेळेतच दोन्ही आरोपींना अटक केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.