कल्याण : आपल्या जवळील भारतीय प्रमाणीकरण नाममुद्रेच्या असलेल्या सोन्याच्या अंगठ्या त्या खऱ्या सोन्याच्या आहेत असे दाखवून ठाण्यातील वर्तकनगर भागात राहणाऱ्या एक महिला आणि एक व्यक्तिने या बनावट अंंगठ्या कल्याणमधील दोन सराफांकडे गहाण ठेवल्या. त्या बदल्यात या सराफांकडून प्रत्येकी तीस हजार रूपये असे एकूण साठ हजार रूपये स्वीकारले. या सोन्याच्या अंगठ्या प्रमाणीकरण केलेल्या असल्या तरी त्या खोट्या आहेत याची जाणीव झाल्याने सराफांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे.
पराग किरण जैन (४५) असे तक्रारदार सराफाचे नाव आहे. ते कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावरील जैन सोसायटी परिसरात कुटुंबीयांसह राहतात. सराफ जैन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अश्विन सागर शेवाळे (३२), मयूर विनोद पाटोळे (३४) यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. हे दोघेही ठाणे पश्चिमेतील वर्तकनगर भागातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक तीन, विठ्ठल मंदिराच्या मागे अशोक निवास चाळीत राहतात. बुधवारी आणि शुक्रवारी हे फसवणुकीचे प्रकार कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौकातील पंकज ज्वेलर्स, संघवी छोरमल दानाजी ज्वेलर्स दुकानात घडले आहेत.
गेल्या वर्षभरात अनेक भुरट्या चोरांंनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून कल्याण, डोंबिवलीतील सराफाच्या दुकानांमध्ये दिवसाढवळ्या जाऊन हात चलाखी करून सराफांच्या दुकानातील लाखो रूपयांच्या सोन्याचा ऐवजांवर डल्ला मारला आहे. यामध्ये महिला, पुरूष चोरट्यांचा सहभाग आहे.
तक्रारदार पराग जैन यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपल्याकडे गुन्हा दाखल महिला आणि पुरूष इसम नामे अश्विनी शेवाळे आणि मयूर पाटोळे हे ठाण्यातून आले. आम्हाला पैशाची गरज आहे. आमच्या जवळ भारतीय प्रमाणीकरण नाममुद्रेच्या सोन्याच्या अंगठ्या आहेत. या अंगठ्या आम्हाला गहाण ठेऊन पैसे हवेत अशी मागणी करू लागले.
या दोन्ही इसमांनी तक्रारदार पंकज ज्वेलर्सचे पराग जैन, या दुकानाच्या बाजुला असलेल्या महेंद्र रिकबचंद शंकळेशा, रितेश जैन यांच्याकडे सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेऊन पैसे देण्याची मागणी केली. या दोन्ही सराफांनी अंगठ्यांवरील प्रमाणीकरणाची नाममुद्रा पाहून हे दागिने खरे आहेत, असे वाटून त्यांनी आपल्या जवळील प्रत्येकी तीस हजार रूपये असे एकूण साठ हजार रूपये अश्विनी शेवाळे आणि मयूर पाटोळे यांना दिले. गहाणवटीचे पैसे परत केल्यावर अंगठ्या परत देण्यात येतील, असे सराफ आणि इसमांमध्ये ठरले.
हे दोन्ही इसम निघून गेल्यावर पराग जैन यांनी या सोन्याची शुध्दता तपासणीसाठी सोन्याच्या अंगठ्या तज्ज्ञ सोने पारखीकडे पाठविल्या. पारखीने हे सोन्याचे दागिने प्रमाणीकरण असले तरी ते बनावट आहेत असे जैन आणि शंकळेशा यांना सांगितले. आमच्या जवळील दागिने खरे आहेत असे भासवून आपल्याकडून पैसे देऊन आपली फसवणूक केली म्हणून जैन यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शेवाळे, पाटोळे यांच्या विरुध्द तक्रारी केली आहे. हवालदार किरपण याप्रकरणाचा तपास करत आहेत.