लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पाथर्ली भागात एकतर्फी प्रेमातून एका विवाहितेवर गेल्या आठवड्यात हल्ला करून फरार झालेल्या तरुणाला टिळकनगर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. तरुणाने हल्ल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. जिग्नेश जाधव (२५, रा. देसलेपाडा, डोंबिवली पूर्व) असे अटक आरोपीचे नाव आहे.

डोंबिवलीतील एका तरुणीचा वाशिंद येथील एका तरुणाबरोबर प्रेम विवाह झाला होता. ही तरुणी डोंबिवलीतील पाथर्ली भागात राहणाऱ्या आईच्या घरी राहण्यासाठी आली होती. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या विवाहितेला तिचा जुना मित्र भेटला. त्याने विवाहितेला लग्नाची गळ घातली. तरुणीने त्यास स्पष्ट शब्दात नकार देऊन ती तेथून निघाली. त्यावेळी आरोपी जिग्नेशने विवाहितेचा पाठलाग करून तिला काही कळण्याच्या आत तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर जिग्नेश तेथून पळून गेला होता. या विवाहितेच्या भावाने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवली वळण रस्त्याच्या दुतर्फा वनराई बहरणार, बाराशे झाडांच्या लागवडीचे नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. जिग्नेशच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके तयार केली होती. तो नाशिकला पळाला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे पथक नाशिकला धडकले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी जिग्नेशला अटक केली. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, हवालदार श्याम सोनवणे, अजित राजपूत, संदीप सकपाळ, उमेश राठोड, रवींद्र बागल यांच्या पथकाने ही कारवाई केली.