भगवान मंडलिक

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत जुलै मध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी राबविलेल्या तपासणी मोहिमेत एकूण ३५० रिक्षांची तपासणी केली. या तपासणीच्या वेळी २५० रिक्षा चालक नियमबाह्य रिक्षा चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. अशा बेशिस्त रिक्षा चालकांकडून एकूण दोन लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी दिली.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात एकूण १२ हजाराहून अधिक परवानाधारी रिक्षा आहेत. अनेक रिक्षा चालक रिक्षेची कागदपत्र सोबत न ठेवता नियमबाह्य प्रवासी वाहतूक करतात. रिक्षेचे काही मूळ मालक आपल्या रिक्षा भाड्याने काही जणांना भाड्याने चालविण्यास देतात. असे चालक प्रवासी वाहतूक करताना प्रवाशां बरोबर गैरवर्तन करतात. वाढीव भाडे आकारतात. काही भाडे नाकारतात. बहुतांशी रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करतात. अशा तक्रारी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विनोद साळवी यांच्याकडे आल्या होत्या.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळवी यांनी मोटार वाहन निरीक्षकांची चार तपासणी पथके तयार करुन कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात अचानक जाऊन रिक्षांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. जुलै महिन्यात ३० दिवस हा तपासणी मोहिमेचा उपक्रम ‘आरटीओ’कडून सुरू होता. या तपासणीत एकूण ३५० रिक्षा चालकांच्या रिक्षांची तपासणी करण्यात आली. अचानक होत असलेल्या या तपासणीमुळे रिक्षा चालकांना रिक्षा सोडून पळून जाता येत नव्हते. जागीच सापडलेल्या अनेक रिक्षा चालकांकडे रिक्षेची परवाना, अनुज्ञप्ती, बिल्ला, गणवेश आढळून आला नाही. अशा रिक्षा चालकांना जागीच ५०० रुपयांपासून ते दोन हजाराहून अधिक दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती साळवी यांनी दिली.

काही रिक्षा चालक मूळ मालकांच्या रिक्षा भाड्याने चालवित असल्याचे आणि मूळ मालक परप्रांतात गावी राहत असल्याचे निदर्शनास आले. अशा चालकांवर दंडात्मक आणि न्यायालयीन दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही प्रवाशांनी रिक्षा चालक वाढीव भाडे आकारत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. अशा रिक्षा चालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही तपासणी मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे, असे सा‌ळवी म्हणाले.

अनेक रिक्षा चालक रिक्षेची आयुमर्यादा संपुनही रिक्षा चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने अशा १० रिक्षा चालकांचे परवाना, अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे. १० रिक्षा चालकांनी अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन केल्याने आणि त्यांनी कागदपत्रांची पूर्तना न केल्याने त्यांना कल्याण न्यायालयात हजर करुन न्यायालयामार्फत त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे साळवी यांनी सांगितले.

रिक्षा चालक तक्रारी

जादा भाडे आकारणी १३ रिक्षा चालक
मीटर वेगवान करणे तीन तक्रारी
भाडे नाकारणे १० तक्रारी
वाढीव प्रवासी बसविणे १५
प्रवाशांशी गैरवर्तन १४
बेशिस्तीने रिक्षा चालविणे १८९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा चालकांविषयी अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने जुलैमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. २५० रिक्षा चालक तपासणीत दोषी आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड टाळण्यासाठी चालकांनी वाहनतळांवरुन प्रवासी सांगेल त्याप्रमाणे मीटर, शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक करावी. ही तपासणी नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे. – विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण