वायू प्रदूषणामुळे त्रस्त नागरिकांची समाजमाध्यमांवर मोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे, कल्याण या शहरांपाठोपाठ झपाटय़ाने विकसित होत असलेल्या अंबरनाथ शहरातील वायू आणि जलप्रदूषणाने स्थानिक नागरिकांचा जीव नकोसा केला आहे. आकर्षक दर आणि निसर्गरम्य वातावरणाच्या जाहिरातींना भुलून अंबरनाथमध्ये घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांना आता येथे वास्तव्य करणे अशक्य वाटू लागले आहे. त्यामुळेच आता काही नागरिकांच्या एका गटाने ‘अंबरनाथमध्ये घरे घेऊ नका’ असे आवाहन करणारी मोहीमच समाजमाध्यमावरून सुरू केली आहे.

ठाणे तसेच आसपासच्या शहरांचे वेगाने होत असलेले नागरीकरण येथील बांधकाम उद्योगासाठी नेहमीच सकारात्मक ठरले आहे. ठाण्यातील घोडबंदर, दिवा-कल्याण मार्ग, कल्याण-टिटवाळा, भिवंडी तसेच अंबरनाथ-बदलापूर या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुलांची बांधकामे सुरू असून गेल्या काही वर्षांत मंदीच्या चर्चेनंतरही बांधकाम उद्योगांसाठी हे टापू महत्त्वाचे मानले जात आहे. मुंबई, ठाण्याच्या गर्दीपासून दूर असलेला अंबरनाथ, बदलापूर परिसर हा निसर्गरम्य तसेच तुलनेने शांत असल्याने सुरुवातीच्या काळात सेकंड होम घेणाऱ्यांसाठीही हा भाग महत्त्वाचा पर्याय समजला जात होता. आता येथे होणारी वाहनकोंडी, प्रदूषण, कचराभूमीमुळे बांधकाम उद्योगालाही अवकळा आल्याची चर्चा आहे. आता तर रहिवाशांनीच येथे घर घेऊ नका, असे आवाहन सुरू केल्याने यंत्रणा आणि विकासक धास्तावले आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कितीही दावे केले गेले तरी अंबरनाथ औद्योगिक पट्टय़ातील प्रदूषण हेदेखील येथील रहिवाशांसाठी दुखणे ठरले आहे. याविरोधात नागरिकांनी पुढे येत संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्याचे काम सातत्याने केले जात असले तरी त्यात यश येताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी एक अनोखी मोहीम उघडली आहे. यात अंबरनाथमध्ये घर घेऊ  इच्छिणाऱ्यांनी येथे घर घेऊ न प्रदूषणाच्या विळख्यात अडकू नका असा संदेश देण्यात येतो आहे. अंबरनाथच्या सिटिजन्स फोरमतर्फे ही समाजमाध्यमांवर ही मोहीम सुरू करण्यात आली असून अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरांतील प्रदूषणाची माहिती देण्यात येते आहे. छायाचित्र, प्रदूषणाचे आकडे, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष, यासंबंधीच्या बातम्यांचा आधारही घेतला जात आहे.

प्रदूषणाच्या घटनांमुळे अस्वस्थता

चिखलोली धरणाशेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतीने शहराचे पाणी अशुद्ध केले आहे, अशा तक्रारी अजूनही सुरू आहेत. त्यासोबत वेशीवर असलेल्या कचराभूमीने आसपासच्या नागरिकांना कोंडून टाकले आहे. कचराभूमीमुळे मोरीवली गाव, बी केबिन रस्ता आणि आसपासच्या नागरिकांना बाराही महिने दरुगधीला सामोरे जावे लागते. त्यात सातत्याने लागणाऱ्या आगीमुळेही त्रासात भर पडते.

अंबरनाथ पूर्वेच्या विशिष्ट भागात नागरिक घर घेऊन पश्चात्ताप करत असून त्यांची घोर फसवणूक झाली आहे. सोयीसुविधांच्या नावाखाली प्रदूषणाचा हा प्रकार लपवून ठेवला तर तो नव्याने येणाऱ्या रहिवाशांनाही त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे इतरांची फसवणूक होऊ  नये म्हणून ही मोहीम सुरू आहे. – सत्यजीत बर्मन, अंबरनाथ सिटिजन्स फोरम

आम्ही दहा वर्षांपासून कचराभूमी हटवण्याची मागणी करीत आहोत. यामुळे कचराभूमीलगतच्या परिसरातील नागरिक घरे खरेदी करून पश्चात्ताप करीत आहेत. याचा परिणाम भविष्यातील गृहविक्रीवरही होऊ शकतो.      – नंदलाल दलाल, बांधकाम व्यावसायिक, दलाल ग्रुप

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution in thane
First published on: 14-11-2018 at 03:36 IST