मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवी मुंबई – डोंबिवली दरम्यानचा प्रवास केवळ १५ मिनिटांत करता यावा यासाठी हाती घेतलेल्या ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गाच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ऐरोलीच्या दिशेने शेवटचा गर्डर बसविण्यात आला आहे. तर ठाणे- बेलापूर मार्गावरील भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण १६ पीएससी आय गर्डरही यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत.

नवी मुंबई आणि डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने १२.३० किमी लांबीच्या ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली – डोंबिवलीमधील अंतर थेट १० किमीने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे – बेलापूर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (जुना मुंबई पुणे महामार्ग) दरम्यान ३.४३ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश आहे. यात ३ – ३ मार्गिकांचा आणि १.६९ किमी लांबीचा दुहेरी बोगदा असून उर्वरित रस्ता उन्नत आणि सामान्य रस्ता असेल. पहिल्या टप्प्यातील उन्नत मार्गिकेचे ९२ टक्के काम पूर्ण झाले असून बोगद्याचे ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील २.५७ किमी लांबीचा संपूर्ण उन्नत मार्ग आहे. या टप्प्यातील सुमारे ६७.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्यातील कल्याण-शीळ रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका यांना जोडणारा ६.३० किमीचा पूर्ण उन्नत मार्ग असणार आहे. ऐरोली – काटई उन्नत मार्ग पूर्ण झाल्यास नवी मुंबई – डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत करता येणार आहे.

हेही वाचा… मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू असून आता हे काम पूर्णत्वाच्या दिशेने चालले आहे. या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील शेवटच्या पीएससी आय गर्डरसह सर्व गर्डर बसविण्यात आले आहेत. ठाणे- बेलापूर मार्गावरील भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण १६ पीएससी आय गर्डर बसविण्यात आले आहेत. हे गर्डर २३ ते २८ मीटर लांबीचे असून प्रत्येक गर्डरचे वजन जवळपास ४८ मेट्रिक टन इतके आहे. सुमारे २५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेनच्या साहाय्याने हे गर्डर बसविण्यात आले आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आले होते. पहिला ब्लॉक २५ आणि २६ मार्च रोजी, तर दुसरा ब्लॉक २९ आणि ३० मार्च दरम्यान रात्री १०:३० ते सकाळी ६:०० या कालावधीत घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील शेवटचा गर्डर बसविण्यात आल्याने आता पहिला आणि दुसरा टप्पा एकमेकांशी जोडला जाणार आहे. या कामाच्या अनुषंगाने आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.