शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम ही शिवसेनेची शाखा हायजॅक करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. आज शिंदे गटाने या शाखेवर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारला आहे. विशेष म्हणजे आजच उद्धव ठाकरे हे ठाण्यात दौऱ्यावर आहेत. हा फलक ठाकरे येणार म्हणून उभारण्यात आल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. तर फलकामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. हेही वाचा >>> आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार? टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमात दिघे हे पक्षाचा कारभार चालवत आणि जनतेशी संवाद साधत असत. दिघे यांच्या निधनानंतर शिवसैनिक या आश्रमात उपस्थित राहत होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये कोण या शाखेत बसेल यावरून धुसफूस सुरू होती. दोन्ही गट या आश्रमात उपस्थित राहत होते. आज अचानक आनंद आश्रमाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा फलक या ठिकाणी बसविण्यात आला. विशेष म्हणजे आजच उद्धव ठाकरे हे देखील ठाण्यात आहेत. ते टेंभीनाक्यावर आनंद दिघे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास गेले होते. त्यामुळेउद्धव ठाकरे येणार असल्याचे कळताच अचानक हे फलक उभारण्यात आले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.