scorecardresearch

आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त निष्ठावान कोण? यावरुन आज ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Eknathh Shinde
आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार?

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती असून ठाण्यामध्ये या जयंतीच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे हे ठाण्यात आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर ते आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंना आदरांजली वाहतील, असे बोलले जात होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पाठ फिरवली. त्यामुळे शिंदे गटासहीत ठाण्यातील काही कडवट शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आज आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रम येथे ठाकरे गटाचे नेते अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मात्र शिंदे गटाच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागू शकतो.

५० खोके घोषणेवरुन ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले

उद्धव ठाकरे यांनी काल आरोग्य शिबिराच्या निमित्ताने राजकीय भाषण करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र तरिही त्यांनी निष्ठेच्या पंघरुणाखाली लपलेले लांडगे, असे वक्तव्य केले होते. तसेच ‘५० खोके…’ ही घोषणा काश्मीरमध्ये पोहोचली असल्याचेही ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यावर पलटवार करतील अशी शक्यता आहे. आज आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कॅबिनेट मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.

हे वाचा >> उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न

तर ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि इतर नेते हे आनंद आश्रमात जाणार असल्याचे कळते. मात्र शिंदे गटाकडून त्यांचा विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढच्या काही दिवसांत ठाण्यात जाहीर सभा घेऊन राजकीय भाष्य करु, असे सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आजच ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.

हे ही वाचा >> उद्धव ठाकरे ठाण्यातल्या आनंद आश्रमात का गेले नाहीत? ‘हे’ कारण आलं समोर

उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टीची चौकशी केली

शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. जेव्हा दिघे यांचे निधन झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला बोलावून घेतले होते आणि दिघे यांची प्रॉपर्टी किती आहे आणि ती कुणाकुणाच्या नावावर आहे, याची चौकशी केली होती. शिंदे म्हणाले की, मला वाटलं होतं ठाकरे हे दिघेंच्या कामाबाबत बोलतील. त्यांनी पक्ष कसा वाढवला? ठाण्यात आता पुढे कसे काम करायचे? यावर चर्चा होईल. मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाने मला धक्काच बसला, असा आरोप शिंदे यांनी केला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या