कल्याण : कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाच्या शिवसेनेतील बंडखोरीवर उभारलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी बु‌धवारी पहाटे वरिष्ठांच्या दबावाने कारवाई केल्याने कल्याण, डोंबिवलीतील शिवसैनिक संतप्त झाला आहे. या तप्त पार्श्वभूमीवर कल्याण मधील एक सामान्य शिवसैनिक आणि कल्याण डोंबिवली शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंडखोरीच्या विषयावर थेट खुले पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

शिक्षण मंडळ सदस्य अनिल काकडे यांनी मंडळात चांगले काम केल्यानंतर त्यांच्यावर चांगली जबाबदारी देण्याचे आदेश यापूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी शिंदे यांनी कधी केलीच नाही, अशी खंत काकडे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. हे पत्र आता सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. कल्याण मधील निष्ठावान शिवसैनिक आता महापालिका निवडणुका तोंडावर येऊ लागल्या तसा अधिक आक्रमक होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठाणे : सेंट जॉन द बाप्टिस्ट शाळेच्या “सेंट जॉन लर्निंग ॲप” चे उद्घाटन

विजय तरुण मित्र मंडळाच्या गणेशोत्सवातील देखाव्यावर पोलिसांनी कारवाई करताच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने जमवून शासन, पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी मंडळाच्या मंडपा समोर महाआरती केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आता पोलिसांच्या माध्यमातून शासन करत आहे, अशी भावना कल्याण, डोंबिवलीतील निष्ठावान शिवसैनिकांची झाली आहे. या दबावतंत्राला निष्ठावान शिवसैनिक दबणार नाही, असे शिवसैनिकांचे मत आहे.या तप्त वातावरणात एक सामान्य शिवसैनिक काकडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले पत्र लिहिल्याने हे पत्र आणि त्यामधील विषय चर्चेचा विषय झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले पत्र
प्रति,
श्री. एकनाथजी शिंदे
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र
माझे काय चुकले, असा प्रश्न आपण विचारत असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तुमचे एवढेच चुकले कि तुम्ही पक्षाचे धोरण आणि आदेश कसाही असला तरी निष्ठावंत म्हणून पाळायला पाहिजे होता. यासाठी फडणवीस साहेबांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. त्यांना उप मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा पक्षाचा आदेश आला. त्यांनी तो पाळला. आपणांस, पक्षाचे धोरण मान्य नसेल तर नैतिकता म्हणून आमदारकीचा राजीनामा देवून पक्ष सोडायला पाहिजे होता. तुमचे तसे न करणे हिच तुमची चूक आहे. त्यामुळेच गद्दार हा शिक्का तुमच्या कपाळावर कायमचा बसला आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमचा उल्लेख गद्दार असाच होईल.तुम्ही म्हणता कि आम्हाला गद्दार म्हणू नका. पण जेव्हा संपूर्ण ठाणे जिल्हा तुमच्या ताब्यात होता आणि ग्रामपंचायत ते महानगर पालिकेच्या निवडणूकीत तुम्ही तिकिट वाटप करत होता. तेव्हा तुमच्याकडूनही अनेकांवर अन्याय झाला. पण त्यांना न्याय देण्याची भाषा करण्याऐवजी त्याने केलेल्या बंडखोरीनंतर किंवा त्याने उमेदवाराच्या विरोधात काम केल्यानंतर आपण स्वतः त्याला गद्दार असे संबोधून धर्मवीरांची गद्दारांना क्षमा नाही अशीच भाषा वापरत होता हे आपण कसे विसरता आपली स्वतःची राजकीय सुरूवात सामान्य शिवसैनिक म्हणून झाली असल्याने नेत्यांनी किमान आपले ऐकून तरी घ्यावे अशी अपेक्षा असते हे आपणास ठाऊक आहे. अन्याय झाल्यावर त्याच्या मनाची घालमेल आपणांस ठाऊक आहे. पण आपण सामान्य शिवसैनिकांचे फोनही उचलत नसत. याबाबत वृत्तपत्रांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या. परंतु तरीही आपल्या कार्य पद्धतीत बदल झाला नाही. सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाचा फोन म्हणजे तुम्हाला अवघड जागेवरचे दुखणे तर ठेकेदार, बिल्डर, उच्च अधिकारी, बडे राजकीय नेते यांचे फोन म्हणजे स्वर्ग सुख वाटत असावे.

उद्धव साहेबांचे काय चुकले

आपण जसे माझे काय चुकले असा प्रश्न विचारता तसेच सामान्य शिवसैनिक आणि राजकारणाशी संबंध नसलेली जनता आपणास विचारते कि उद्धव साहेबांचे काय चुकले शिवसेनेने एक रिक्षा चालक असतांना आपणास शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्रीपद तसेच संघटनेत दुसरया क्रमांकाचे शिवसेना नेतेपद बहाल केले. एवढेच नाही तर अधिकारही दिले. आपण किती बाय कितीच्या खोलीत राहत होता हे आठवा आणि आताचा आपला आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या बघा. एवढे सगळे कुणाच्या जीवावर शिवसेनेच्याच ना शिवसेनेत मानाचे स्थान, अधिकार कुणी दिले उद्धवसाहेबांनीच ना पण आपण त्याबदल्यात निष्ठा देण्याऐवजी पाठित खंजीर खुपसला. खंजीर खुपसण्याऐवजी राजीनामा देवून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिला असता तरी लोकांमध्ये तुमची प्रतिमा आणखी उंचावली असती. निष्ठा म्हणजे काय यासाठी माझेच उदाहरण बघा शिक्षण मंडळात भरीव कार्य केल्यानंतर उद्धव साहेबांनी २००५ साली माझ्यावर दुसरी जबाबदारी टाकण्याचे आदेश दिले होते पण आपण तो आदेश पाळलाच नाही. पण तरीही मी निष्ठा सोडली नाही. २००५ ते २०२२ अशी १७ वर्ष झाली मी फक्त शिवसैनिक म्हणून निष्ठेने काम करतो आहे. पद दिले नाही तर लोक तीन महिन्यात पक्ष सोडतात. खरं म्हणजे माझ्यातल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तरीही शिवसैनिक म्हणून आजपर्यंत काम करतो आहे. याला कारण आहे निष्ठा मीही दुसरया पक्षात जावू शकलो असतो पण ती गद्दारी ठरली असती आणि गद्दारी माझ्या रक्तात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज तुमच्याकडे लोक स्वार्थापोटी हाजी हाजी करतील पण जेव्हा तुम्ही खुर्चीवर नसाल तेव्हा हेच लोक तुम्हाला काडीचाही सन्मान देणार नाही. कारण इतिहास साक्षी आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना भारतीय जनतेने कधीच आदराचे स्थान दिले नाही. मग तो राजा जयचंद असो, मीर जफर असो किंवा खंडोजी खोपडे असो अगदी रामायण काळातही गेलात तरी विभिषणाने जरी साक्षात प्रभू रामचंद्राला साथ दिली असली तरी विभिषणाबद्दल कुणाच्याही मनात आदर तर नाहीच पण विभिषणाला डोळ्यासमोर ठेवून घर का भेदी लंका ढाये हा वाक्प्रचार तयार झाला. – अनिल काकडे, माजी सदस्य, शिक्षण मंडळ , कल्याण डोंबिवली महानगरपालिका