ठाणे : मतदान यंत्र हॅक होत असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी (अजित पवार गट) ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले होते. त्यावर सरकारला बॅलेटवर निवडणुक घेण्यास सांगाच, असे आव्हान देत असे केल्यास राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढून एक लाख मताधिक्याने जिंकेल, असा प्रतिउत्तर आव्हाड यांनी दिले आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आता वाक् युद्ध रंगल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा झालेल्या पराभवावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्राबाबत संशय व्यक्त केला होता. त्यासाठी उदाहरण म्हणून त्यांनी काही मतदार संघात झालेल्या मतदानाचा दाखलाही दिला होता. तसेच मतदान यंत्र हे मानव निर्मीत असल्यामुळे ते हॅक होऊ शकते, असा दावा ही त्यांनी केला होता. यावरूनच राष्ट्रवादी (अजित पवार गट) ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुले आव्हान दिले होते. ‘लोकसभेतील जे यश मिळाले ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळाले आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर ते मतदान यंत्र हॅक झाले अशाप्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे.

हेही वाचा…पुनर्मोजणीसाठी मतदान झालेल्या यंत्राऐवजी दुसरे यंत्र दाखवणार, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझे तर खुले आव्हान जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना वाटत असेल की मतदान यंत्र हॅक होते आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल,’ असे परांजपे यांनी म्हटले होते. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना हे आव्हान स्विकारत सरकारला बॅलेटवर निवडणुक घेण्यास सांगाच, असे आव्हान आव्हाड यांनी परांजपे यांना दिले आहे. ‘तुमची सरकारमध्ये खूप चालते आहे. त्यामुळे सरकारला बॅलेटवर निवडणुक घेण्यास सांगाच, असे आव्हान आव्हाड यांनी परांजपे यांना दिले आहे. सरकारने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर, मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढेन आणि एक लाख मताधिक्याने जिंकेल,’ असा प्रतिउत्तर आव्हाड यांनी दिले.