कल्याण – कल्याण डोंबिवली पोलीस परिमंडळात अनंत चुतर्थीनिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गणपती विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी एक हजार २३३ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत खासगी आणि सार्वजनिक अशा एकूण १४ हजार ४८३ गणपतींचे विसर्जन होईल, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
कल्याण, डोंबिवलीत एकूण १७३ सार्वजनिक आणि १४ हजार ३१० खासगी गणपती आहेत. शहर परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गणपती विसर्जनाचे मिरवणुक मार्ग, विसर्जन घाट, शहरातील मुख्य चौक भागात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. एका उपायुक्तांच्या अधिपत्त्याखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असे एकूण १४५ पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत. ९१८ हवालदार, गृहरक्षक दलाचे ११० कर्मचारी आणि विशेष राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या शहरात तैनात असणार आहेत, अशी माहिती उपायुक्त झेंडे यांनी दिली.
शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून गणेशोत्सवापूर्वीच काही समाजकंटकांना प्रतिबंधात्मक आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. काहींना स्थानबध्द करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, असे उपायुक्तांनी सांगितले.
डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाणे हद्दीत १० सार्वजनिक गणपती, दोन हजार ३१५ खासगी गणपती आहेत. विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत २० सार्वजनिक, ९२५ खासगी, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत १७ सार्वजनिक, तीन हजार खासगी, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत नऊ सार्वजनिक, २५० खासगी, कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत ३७ सार्वजनिक, ७०० खासगी, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत ३२ सार्वजनिक, ९५० खासगी, कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत ३५ सार्वजनिक, पाच हजार २९० खासगी, खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत १३ सार्वजनिक, ८८० खासगी गणपती आहेत.
गणेशोत्सव, ईद सणाचा विचार करून गेल्या आठवडाभर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दीडशे ते दोनशे पोलिसांचे एका वेळी पथसंचलन करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त सहभागी झाले होते.
विसर्जन स्थळी कल्याण डोंबिवली पालिकेने कृत्रिम तलाव, उल्हास खाडी किनारी प्रखर झोताचे दिवे, मंच, निर्माल्य कलश अशी चोख व्यवस्था केली आहे.