ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील दोन, तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढविण्याचे कार्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच भविष्यात धिम्या मार्गिकेवर १५ डब्याच्या रेल्वेगाड्या सुरु केल्यास त्याच्या नियोजनासाठी ही कामे सुरु असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात लाखाहून अधिक प्रवासी वाहतुक करतात. येथील फलाट क्रमांक दोनवरुन कल्याण, कसारा, बदलापूर शहराच्या दिशेकडे तसेच तीनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कर्जत, बदलापूर, आसनगावच्या दिशेने आणि फलाट क्रमांक चारवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील धिम्या रेल्वेगाड्यांची वाहतुक होते. त्यामुळे या तीनही फलाटांवर प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेते मोठी गर्दी होते. फलाट क्रमांक चारवर दिवसभर प्रवाशांचा भार असतो. पावसाळ्यात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास या फलाटांवर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होते. महिला तसेच वृद्धांना या प्रवासामध्ये सर्वाधिक हाल सहन करावे लागते.
रेल्वेगाड्यांमधील गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून १५ डब्याच्या रेल्वेगाड्या चालविल्या जातात. एकूण फेऱ्यांपैकी केवळ २० ते २२ फेऱ्या १५ डब्यांच्या आहेत. तसेच या गाड्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत धावतात. धिम्या मार्गिकेवर १५ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावत नसल्या तरीही भविष्यात त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन, तीन आणि चार हे १२ डब्यांच्या रेल्वेगाड्यांसाठी आहेत. तर पाच आणि सहा हे फलाट मोठे असून येथे जलद उपनगरीय आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या थांबतात. या फलाटांवर १५ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून फलाट क्रमांक दोन, तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढविण्यास सुरुवात झाली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गर्दी विखुरण्यासाठी तसेच भविष्यात १५ डब्यांच्या रेल्वेगाड्या या फलाटांवर थांबू शकतात. त्यामुळे फलाटांची लांबी वाढविली जात आहे. येत्या डिसेंबरमध्ये ही कामे पूर्ण होण्याची शक्यात आहे असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
