ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलकावर ‘मुंब्रा देवी’ असा उल्लेख असलेले फलक चिटकविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संबंधित फलक पोलिसांनी काढला असून याप्रकरणीची नोंद मुंब्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पोलीस ठाण्यात करण्यात आली.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानक हे रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे. या स्थानकात धिम्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असतात. शिळफाटा, मुंब्रा भागात गोदामे देखील आहेत. त्यामुळे व्यवसायिक देखील येथून वाहतुक करतात. मुंब्रा शहरालगतच्या डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. या मंदिरातही दिवा, शिळफाटा तसेच ठाणे शहरातील नागरिक दर्शनासाठी जातात. दुसरीकडे मुंब्रा शहरात बहुतांश वस्ती मुस्लिम समाजाची आहे.
मुंब्रा स्थानकातील नावाच्या फलकावर दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मुंब्रा देवी उल्लेख असलेले बॅनर चिटकविले. समाजमाध्यमांवर देखील हे छायाचित्र मोठ्याप्रमाणात प्रसारित झाले. घटनेची माहिती मुंब्रा रेल्वे पोलीस दल आणि लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे फलक काढून टाकले. याप्रकरणी मुंब्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून हे फलक कोणी लावले याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरु आहे.
