बदलापूर : गणेशोत्सवासाठी वडिलांच्या गावी गुजरातला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाला त्याच्याच ओळखीच्या लोकांनी गणपती दर्शनाच्या नावाखाली पळवून नेले आणि त्याच्या आईकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र बदलापूर ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांच्या अथक तपासानंतर तीन आरोपींना अटक करून मुलाला सुखरूप त्याच्या आईकडे परत आणले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वांगणी येथील एका महिलेचा अल्पवयीन मुलगा ३१ सप्टेंबर रोजी गुजरातमधील आपल्या वडिलांच्या गावी गणेशोत्सव पाहण्यासाठी गेला होता. मडोसा गावातील आपल्या ओळखीच्या लोकांना त्याने याची कल्पना दिली होती. तो गावी जाऊन त्यांना भेटला आणि त्यांच्यासोबत गणपती दर्शनासाठी निघाला. याचवेळी आरोपींनी त्याला एका चारचाकी गाडीतून जंगलात नेले आणि डांबून ठेवले.

त्यानंतर त्त्यांनी मुलाच्या आईला फोन करून त्याच्या सुटकेसाठी १२ लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या आईने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनंतर याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक गोविंद पाटील यांनी तात्काळ दोन पथके गुजरातला रवाना केली.

गुजरातमधील पोलिसांनी त्या गावात तपास सुरू केल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर या आरोपींच्या पायाखालची वाळू सरकली आणि आरोपी घाबरले. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुलाला एका बस थांब्यावर सोडून पळ काढला. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून मडोसा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासातून लक्ष्मण खैर, नरेश खैर आणि अनिल खैर या आणखी आरोपींना राजस्थान सीमेजवळून अटक करण्यात आली.

दरम्यान, पुन्हा पकडले जाण्याच्या भीतीने मुलाने आपला मोबाईल बंद केला. त्यानंतर मुलाने धाडसी प्रवास करत चाळीसगाव येथील मामाचे गाव गाठले.

पोलिसांनी तांत्रिक तपासणीच्या मदतीने तीन दिवसांनंतर त्याला चाळीसगाव येथून सुखरूप ताब्यात घेतले आणि बदलापूर येथे त्याच्या आईच्या स्वाधीन केले. केवळ पैशांच्या हव्यासापोटी आरोपींनी हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली. या यशस्वी तपासात पोलिस उपनिरीक्षक यशवंत कदम, अनंता पाटील, कनोजे, परमार आणि काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.