बदलापूरः बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. मात्र या प्रकरणाच्या तपासात आढळून आलेल्या एका संभाषणातून पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. घडलेली घटना आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय तपासातून बळावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित लिव्ह-इन सहकाऱ्याला अटक केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असताना, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या ३६ वर्षीय महिला पोलिसाने राहत्या इमारतीच्या गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली होती. यात संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. त्या वेळी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे या घटनेमागील खरे कारण अत्यंत गंभीर असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजीव जाधव यांनी केला.
तपासादरम्यान मृत महिलेच्या मोबाईल फोनमधील काही संभाषणं पोलिसांच्या हाती लागली. त्यात तिच्या लिव्ह-इन पार्टनर निलेश (३८) या इसमासोबतची धक्कादायक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली. महिलेच्या मृत्यूच्या सुमारे दोन तास आधी झालेले हे संभाषण तपासात निर्णायक ठरले असून, त्यात निलेशने धमकीच्या सुरात काही वक्तव्ये केली होती. त्या “तुला हवेतून फेकून देईन… वर पाठवेन!” या वक्तव्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. महिलेच्या भावाने पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात या घटनेचा हत्या असा गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी उपलब्ध पुराव्यांच्य आधारे मुख्य आरोपी निलेशला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी आणि इतर साक्षीदारांनी दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले. सततच्या भांडणांमुळेच हे प्रकरण या स्थितीला पोहोचले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. यात आणखी काही बाबी पुढील तपासात समोर येण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
