Maharashtra Police : बांगलादेशी नागरिकांची भारतात होणारी घुसखोरी हा मुद्दा मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या मुद्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चा होत आहे. सध्या बांगलादेशी घुसखोरांवर पोलिसांकडून होणारी कारवाई तीव्र कऱण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अशाच प्रकारची कारवाई करताना ठाण्यातील एका बंगाली व्यक्तीची महाराष्ट्र पोलिसांकडून बांगलादेशात रवानगी करण्यात आल्याचा आरोप संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला आहे.
पश्चिम बंगालमधील एका ३६ वर्षीय व्यक्तीला महाराष्ट्र पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित असल्याचा संशय घेत ताब्यात घेऊन शनिवारी पहाटे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्या व्यक्तीची सीमेपलीकडून शेजारच्या देशात रवानगी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र पोलीस आणि बीएसएफने पश्चिम बंगाल पोलीस व राज्य स्थलांतरित कल्याण मंडळाच्या हस्तक्षेपानंतर आणि त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरही त्या व्यक्तीची बांगलादेशात रवानगी केली. मेहबूब शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे.
याबाबत पश्चिम बंगाल स्थलांतरित कल्याण मंडळाचे अध्यक्ष समीरुल इस्लाम यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटलं की, “मेहबूब शेखच्या कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांना पाठवली. मात्र, तरीही महाराष्ट्र पोलिसांनी पश्चिम बंगाल सरकारला कळवण्याची साधी तसदी घेतली नाही आणि बीएसएफने मेहबूब शेख यांची बांगलादेशात रवानगी केली,” असं समीरुल इस्लाम यांनी म्हटलं.
दरम्यान, मेहबूब शेख यांच्या कुटुंबाने सांगितलं की, ते पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भागबंगोला येथील महिषास्थली ग्रामपंचायत क्षेत्रातील हुसेननगर गावचे रहिवासी आहेत. ३६ वर्षीय हा तरुण महाराष्ट्रात गवंडी काम करत होता. शेखचा धाकटा भाऊ मुजीबूर याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, “गेल्या दोन वर्षांपासून माझा भाऊ ठाण्यातील मीरा रोड परिसरात राहत होता. पाच दिवसांपूर्वी (११ जून) तो चहा पित असताना पोलिसांनी त्याला बांगलादेशी असल्याचा संशय घेत ताब्यात घेतलं.”
ग्रामपंचायतीचे प्रधान शब्बीर अहमद यांनी म्हटलं की, “आम्हाला कनाकिया पोलीस ठाण्यातून फोन आला. आम्ही ताबडतोब स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला तसेच आमच्या पंचायत प्रधानांना आणि स्थलांतरित कल्याण मंडळाला कळवलं. त्यांनी सांगितलं की ते महाराष्ट्र पोलिसांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारपर्यंत आम्ही सर्व कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांना पाठवली. ज्यात मेहबूब शेखचे मतदार कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि अगदी आमच्या वंशावळीचा समावेश होता. मात्र, तरीही आमची आमची दखल घेतली गेली नाही, आमचं काहीही ऐकलंही नाही.”
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, “बीएसएफने १४ जून रोजी सांगितलं की मेहबूब शेख यांची बांगलादेशात रवानगी करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर मेहबूबने ज्या गावात आश्रय घेतला होता तेथून फोन केला आणि तो रडत होता. त्याला एक पत्नी आणि तीन मुले आहेत. आम्हाला फक्त तो परत हवा आहे. तो बांगलादेशात किती काळ राहू शकेल हे आम्हाला माहित नाही.”
महाराष्ट्र पोलिसांनी काय म्हटलं?
दरम्यान, मेहबूब शेख यांच्यावरील कारवाईबाबत महाराष्ट्र पोलिसांनी म्हटलं की, “मेहबूब त्याचं राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे देण्यात अयशस्वी ठरला आहे. त्याचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ते आधार आणि पॅन कार्डचा विचार करत नाहीत.” ठाण्यातील मीरा रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक मेघना बुराडे यांनी म्हटलं की, “बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आम्ही ११ जून रोजी मेहबूब शेखसह अनेक संशयितांना ताब्यात घेतले. आम्ही त्यांच्याकडून त्यांची राष्ट्रीयत्व सिद्ध करू शकतील अशी कागदपत्रे मागितली. साधारणपणे आम्ही यासाठी आधार आणि पॅन कार्डचा विचार करत नाही, कारण ते फसवणूक करून मिळवता येतात. म्हणून, आम्ही त्याला त्याचे जन्म प्रमाणपत्र किंवा कोणताही मजबूत पुरावा सादर करण्यास सांगितले. परंतु तो ते सादर करण्यात अयशस्वी झाला आणि तो भारतीय असल्याचा दावा करण्यासाठी इतर कोणतेही कागदपत्र किंवा त्याच्या कुटुंबाची कागदपत्रे सादर केली नाहीत”, असं मेघना बुराडे यांनी सांगितलं.