ठाणे : भिवंडी शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी एक विचित्र अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर, दोघेजण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद शांतीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
भिवंडी शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या पुलावर भिवंडी कल्याण वाहिनीवर एका कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती कार रस्त्याच्या मधोमध गोल फिरु लागली. त्यात, मागून येणाऱ्या दुसऱ्या कारला त्या कारची धडक बसली. तितक्यात भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराला कारची धडक बसली.
कारची धडक बसल्यामुळे तो दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून खाली उडून रस्त्यावर पडला. त्यातच, त्याचा मृत्यू झाला आहे. राहूल दादाराम तरे (३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा दुचाकीस्वार भिवंडीतील अंजुर गावात राहणारा असून बुधवारी कामानिमित्त तो कल्याणच्या दिशेने जात होता. त्यावेळी हा अपघात घडला.
अपघात कसा घडला
भिवंडीकडून कल्याणच्या दिशेने अब्दुला मोहम्मद इलियास अन्सारी हे येत होते. त्यांची कार भादवड येथील अरिहंत सिटी समोर आली असता त्यांच्या कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या दुसऱ्या कारला अन्सारी यांच्या कारची जोरदार धडक बसली. या अपघातात कार चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी गंभीर जखमी झाला. तर, दुसऱ्या कारमधील एअर बॅग उघडल्याने त्यातील चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली.
परंतू, या अपघातात अन्सारी याची गाडी जागेवरच वळल्याने मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीची कारची धडक बसली. त्यामध्ये दुचाकीस्वार राहुल तरे थेट उड्डाणपुलावरून ५० फूट खालील रस्त्यावर फेकला गेला. त्यात, त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शांतीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.