कल्याण – समृध्दी महामार्गाच्या भिवंडी जवळील वडपे गाव ते कसारा दरम्यानच्या सुमारे सव्वाशे किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केले आहे. एक किलो मीटर अंतराने हे कॅमेरे लावले जात आहेत. एक सीसीटीव्ही कॅमेरा ५०० मीटरच्या परिसरावर नजर ठेवेल, अशा पध्दतीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गावर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वेगाची मर्यादा ओलांडून वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना या माध्यमातून लगाम घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

प्रखर भेदन क्षमता असलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनावरील क्रमांक अचूकपणे टिपण्याची क्षमता आहे. या सीसीटीव्ही नियंत्रणासाठी ठाण्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. समृध्दी महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनावर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीचे चित्रिकरण दररोज तपासले जाणार आहे. दिलेली वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहन चालकाला ऑनलाईन माध्यमातून ई चलान पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी समृध्दी महामार्गावर वाहने चालविताना वेग मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन ‘एमएसआरडीसी’ने केले आहे.

मुंबई नागपूर समृध्दी महामार्गामुळे राज्यातील शहरे, जिल्हे, तीर्थक्षेत्रे जवळ आली आहेत. त्यामुळे नागरिकांचा समृध्दी महामार्गाने सुसाट वेगाने जाण्याचा ओढा वाढला आहे. हा रस्ता विना अडथळा, विना वाहतूक कोंडीचा आहे. त्यामुळे वाहन चालक सुमारे ११० ते १२५ च्या वेगाने वाहने चालवितात. काही पट्टीचे वाहन चालक १५० किंवा त्याहून अधिक वेग मर्यादेत वाहने चालवितात. समृध्दी महामार्गावर मोटारींसाठी तासाला १२० किलोमीटर आणि जड, अवजड वाहनांना तासाला ८० किलोमीटर वेग निश्चित करण्यात आला आहे.

अनेक वाहन चालक या वेग मर्यादेचे भान ठेवत नाहीत आणि सुसाट वेगाने वाहने चालवितात. या सुसाट वेगात अनेक वेळा अपघाताची शक्यता असते. तसे प्रकार अलीकडे घडले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने समृध्दीने धावणाऱ्या वाहन चालकांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.समृध्दी महामार्गावरील अपघात रोखणे हाही या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.