लोकसत्ता खास प्रतिनधी

कल्याण : महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर कल्याण पश्चिमेतील भाजपमधील बंडखोर अपक्ष उमेदवार वरूण पाटील यांनी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वरूण पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महायुतीचे नेते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. अखेर सोमवारी त्यांचे मन वळविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळेल या अपेक्षेने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दोन वर्षापासून या मतदारसंघात काम सुरू केले. महायुतीच्या जागा वाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिंदे शिवसेनेला गेला. त्यामुळे नाराज नरेंद्र पवार यांनी महायुतीचे कल्याण पश्चिमेतील उमेदवार शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या विरुध्द उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघात पवार यांचा हक्काचा मतदार असल्याने भोईर यांच्या मतांवर त्याचा परिणाम होणार होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांची नाराजी दूर केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपमधील दुसरे बंडखोर कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांनीही विश्वनाथ भोईर यांच्या विरुध्द उमेदवारी अर्ज भरला होता. पाटील यांच्या उमेदवारीचा काही प्रमाणात फटका भोईर यांना बसणार होता. पाटील हे माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे नातेवाईक आहेत.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

भोईर यांच्या प्रचारात माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा फारसा सक्रिय सहभाग नव्हता. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काम केले नसल्याचा त्यांना राग होता. अशाप्रकारच्या रुसव्यांनी कल्याण पश्चिमेतील महायुतीचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो याविषयावर महायुतीच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, वरूण पाटील यांना महायुतीचे विश्वनाथ भोईर यांचे काम करण्याचा पक्षाच्या वरिष्ठांनी सल्ला दिला. सोमवारी महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर, माजी मंत्री कपील पाटील, शहरप्रमुख रवी पाटील, जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे, मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांनी एका व्यासपीठावर येत आपण विश्वनाथ भोईर यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले.

आणखी वाचा-ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपण निवडणूक कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी उशीर झाला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपणास महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याच्या सूचना केल्या. हा आदेश पाळून आपण उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचार, निवडणूक कामात सहभागी झालो आहोत. आपल्या समर्थकांनीही महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आपण सांगितले आहे.’