कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर परिसरात राहणाऱ्या रहिवाशाची एका दलाल महिलेने नेट बँकिंगच्या माध्यमातून २५ लाख ६१ हजार रूपयांची फसवणूक केली. आरोपी दोन महिलांनी पीडित व्यक्तीला विमा पॉलिसीचा बहाणा करत पैसे भरायला सांगितले. मात्र, दोन वर्ष होऊनही एकूण रक्कम परत मिळत नसल्याने पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर रहिवाशाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने बाजारपेठ पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुध्द सोमवारी (१८ एप्रिल) गुन्हा दाखल केला.

राजेश दत्तात्रेय कुलकर्णी (५०) असे फसवणूक झालेल्या रहिवाशाचे नाव आहे. स्वाती सिंग, मनीषा सिंग अशी आरोपी महिलांची नावं आहेत. जून २०२० ते जून २०२१ कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितले, राजेश यांचे वडिल दत्तात्रेय कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या नावाने १८ लाख रूपयांची विमा पॉलिसी आहे. ही रक्कम परत हवी असेल तर आपणास २४ लाख ३२ हजार ७२६ रूपये नेटबबँकिंद्वारे भरणा करावे लागतील, असे स्वाती सिंग या आरोपी महिलेने राजेश यांना मोबाईलवरून सांगितले.

बजाज फायनान्सच्या नावाने फसवणूक

याप्रमाणे राजेश कुलकर्णी यांनी २४ लाख ३२ हजाराचा भरणा विमा कंपनीत केला. ही प्रक्रिया झाल्यानंतर मनीषा सिंग या महिलेने राजेश यांना मोबाईलवर संपर्क केला. बजाज फायनान्स वित्तीय संस्थेकडून आपणास दोन लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. हे कर्ज तात्काळ हवे असेल, तर आपणास नेटबँकिंद्वारे आपल्या बँक खात्यात एक लाख २९ हजार रूपये भरणा करावे लागतील, असं सांगण्यात आलं. यानंतर राजेश यांनी ही रक्कम भरणा केली.

हेही वाचा : पुण्यात विवाहासाठी स्थळ दाखवण्याचं आमिष देऊन ज्येष्ठाला १६ लाख रुपयांचा गंडा

सुरुवातीला या दोन्ही महिलांनी आपली पूर्ण रक्कम मिळेल असे आश्वासन राजेश कुलकर्णी यांना दिले होते. मात्र, वारंवार संपर्क करूनही या महिला साचेबध्द उत्तर देत होत्या. दोन वर्ष होत आली तरी विम्याची, कर्जाऊ रक्कम मिळत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजेश कुलकर्णी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांच्या विरूध्द तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.