जयेश सामंत, लोकसत्ता ठाणे : मुंबईत अजूनही आपली ताकद राखून असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबई आणि उपनगरांतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मुद्दा हाती घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मुंबईतील शाखा संपर्क अभियानादरम्यान होणारे संक्रमण शिबिरांचे दौरे आणि समूह पुनर्विकास योजनेच्या हालचाली या व्यूहरचनेचाच भाग आहेत. यातून महापालिका निवडणुकीपूर्वी आपल्या गटाचे बळ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईतील रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांसह शहर आणि उपनगरात रखडलेले झोपडपट्टी तसेच म्हाडाचे पुनर्विकास प्रकल्प, संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे होणारे हाल, क्लस्टर योजनेतील अडथळे यांसारख्या मुद्दय़ांना हात घालत उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर कुरघोडी करण्याचे शिंदे गटाचे मनसुबे आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या आठवडाभरापासून मुंबई उपनगरातील काही भागांत दौरे केले. यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकास रखडलेल्या वस्त्या, इमारती असलेल्या परिसराचा समावेश आहे. मुंबईत म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत अनेक प्रकल्पांची वर्षांनुवर्षे रखडपट्टी सुरू आहे. यापैकी काही प्रकल्पांतील संक्रमण शिबिरांचा प्रश्नही गंभीर आहे. अशा काही संक्रमण शिबिरांना भेटी देत खासदार शिंदे यांच्यासमवेत रखडलेल्या प्रकल्पांतील नागरिकांच्या बैठका घडविण्यात येत आहेत. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांची भेट तसेच राज्य सरकारमधील विशिष्ट विभागांकडे या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करण्यात येणारा पाठपुरावा, अशी पद्धतशीर आखणी या दौऱ्यामधून केली जात आहे. मुंबईत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका मोठय़ा मतदार समूहापर्यंत पोहोचण्याचा पद्धतशीर प्रयत्न यानिमित्ताने केला जात असून, यासाठी ठाण्यातील पुनर्विकास प्रकल्पांचे दाखलेही या वेळी आयोजित करण्यात येणाऱ्या सभांमधून दिले जात आहेत. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई वगळता अन्य शहरांवर असलेली आपली पकड सिद्ध करून दाखवली आहे. मात्र, मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्यात त्यांना अपेक्षित यश आलेले नाही. मुंबई महापालिकेतील डझनभर माजी नगरसेवकांनी आतापर्यंत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी अजूनही मुंबईत ठाकरेंची मोठी ताकद आहे. मुंबईतील मराठी वस्त्या, उपनगरांमधून अजूनही ठाकरे यांच्यामागे शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहायला मिळत आहे. बंडानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या शाखा भेटी अभियानालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. ठाकरे यांच्या या ताकदीला धक्का देण्यासाठी शिंदे यांनी आपल्या खासदार पुत्रामार्फत मुंबईत शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईतील ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रभाव आहे त्या उपनगरांमध्ये ठरवून हे दौरे आयोजित केले जात आहेत. यानिमित्ताने मुंबईतील प्रलंबित प्रश्नांवर जाहीर चर्चा सुरू करायची आणि ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अपयश दाखवून द्यायचे अशी रणनीतीही यानिमित्ताने आखली गेली आहे. पुनर्विकासाचे वारे खासदार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील खार गोळीबार परिसरातील शिवालीक व्हेंचर या गृहसंकुलाच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या संक्रमण शिबिराला भेट दिली. शेकडो कुटुंबे १४ वर्षांपासून इथे राहत असल्याचा आरोप करत डॉ. शिंदे यांनी संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची घोषणा केली. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांची संथ गती, संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे हाल, त्यांना मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा या प्रश्नांवर बोट ठेवत आता शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खासदार शिंदे यांनी गेल्या चार भेटींमध्ये याच प्रश्नांचा पुनरुच्चार केल्याचे पाहायला मिळाले. संवाद साधत आहोत. प्रभागांतील समस्या जाणून घेऊन त्या सोडवीत आहोत. या अभियानाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘मातोश्री’तील बंद खोलीत बसून कामे होत नाहीत. नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. आम्ही तेच करत आहोत. - नरेश म्हस्के, राज्य समन्वयक, शिवसेना