ठाणे : मुंब्रा येथील रेल्वे अपघाताला चार दिवस उलटत नसताना दिवा येथील रेल्वे रूळ मधील कुंपणावर चढून प्रवासी थेट रेल्वे गाडीमध्ये शिरताना दिसत आहेत. फलाटांवर गाडी आल्यावर अधिकृत रित्या गाडीमध्ये शिरता येत नसल्याने ही जीवघेणी तारेवरची कसरत प्रवासी करत आहेत. एखादी समोरून येणारी उपनगरी रेल्वे गाडी या प्रवाशांना धडकल्यास मोठे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रवाशांना आवर बसणार की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

दिवा रेल्वे स्थानकातून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांना थांबा मिळतो. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह कोकणातील गावांशी जोडलेली अनेक कुटुंबे दिवामध्ये स्थायिक झाली आहेत. मुंबईत नोकरी करताना कोकणात जाण्या-येण्यासाठी दिवा ही मध्यवर्ती आणि सोयीची जागा ठरते. यामुळे दिवा शहर अतिशय बेशिस्त पद्धतीने वाढले आहे.

मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेल्या या शहरात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषतः कोकणातील नागरिकांसाठी दिवा हे शहर मुंबईच्या जवळचे आणि तुलनेत स्वस्त पर्याय असल्यामुळे त्यांच्या निवासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथील सर्वात मोठी समस्या म्हणजे अनियंत्रित आणि बेकायदेशीर बांधकामे आहेत. मोठ्या प्रमाणावर कांदळवनांमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चाळी, झोपडपट्ट्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा असलेल्या वसाहती वाढल्या आहेत. स्वस्त दरात घरे मिळत असल्याने अल्प उत्पन्न असलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे वास्तव्यास येत आहेत. त्याचा परिणाम स्थानकातील प्रवासी वाहतुकीवर देखील होत आहे.

दररोज सकाळी ८ ते १०.३० या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या फलाटांवर पाय ठेवायलाही जागा नसते. सकाळी मुंबईत जाण्यासाठी काही नोकरदार फलाटावरुन रेल्वेगाडीत प्रवेश करण्याऐवजी धोकादायररित्या रेल्वे रुळ ओलांडत रेल्वेगाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात.

दोन रेल्वे रुळांवरील असलेल्या सळयाच्या कुंपणावर तर कोणी रेल्वे गाड्यांच्या लोखंडी पायऱ्यांवर पाय ठेवून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. जलद रेल्वेगाडीत प्रवेश मिळविण्यासाठी महिला आणि पुरुष प्रवाशांची धक्काबुक्की, वादाचे प्रसंग घडतात. अनेकदा रेल्वेगाडीतील प्रवासी दिवा स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देत नाही. तर धिम्या रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हाच त्रास सहन करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलाटवरून अधिकृतरित्या प्रवेश करता येत नसल्याने ही जीवघेणे कसरत हे प्रवासी करताना दिसतात. अनेकदा फलाटावरती पोलीस किंवा सुरक्षा दलाचे अधिकारी असतात परंतु त्यांच्या समोर देखील हा प्रकार सुरू असतो.