ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ बुधवारी मध्यरात्रीपासून खड्डे बुजविण्याची कामे सुरु होती. या कामांमुळे अवजड वाहनांचा भार वाढून बुधवारी सकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोंडी झाली. मुंब्रा देवी मंदीर ते काळसेकर रुग्णालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.

उरण जेएनपीए बंदरातील हजारो अवजड आणि हलकी वाहने नवी मुंबई, शिळफाटा, डोंबिवली येथून मुंब्रा बाह्यवळण, मुंबई नाशिक महामार्गाने ठाणे, भिवंडी, गुजरात, नाशिकच्या दिशेने वाहतुक करतात. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत.

त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होत असून वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंब्रा देवी मंदीर ते काळसेकर रुग्णालया पर्यंत कोंडी झाली होती. मध्यरात्री अवजड वाहनांना वाहतुक करण्यास परवानगी असल्याने कोंडीत भर पडली.

शिळफाट्यावरही कोंडी

कल्याण शिळफाटा मार्गावरील कल्याण फाटा भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे शिळफाटा ते काटईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा परिणाम शिळ महापे रोड, दहीसर मोरी मार्ग, एमआयडीसी जलवाहिनी मार्गावरील वाहतुकीला झाला.