या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील पु. भा. भावे केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी मतदारसंघाचे काम; इमारत धोकादायक

साहित्य, संस्कृती आणि कलेची उज्ज्वल परंपरा मिरवणाऱ्या डोंबिवली शहरात प्रत्यक्षात या परंपरांची घोर उपेक्षा होत आहे. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान मिळवलेल्या आणि संमेलन मंडप, व्यासपीठांना शहरातील थोर साहित्यिकांची नावे देण्यासाठी आग्रही असलेल्या या शहरातील साहित्यिकांच्या स्मारकांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष झाले आहे. डोंबिवलीत पु. भा. भावे केंद्र हे या उपेक्षेचे बोलके उदाहरण आहे. ही वास्तू धोकादायक अवस्थेत आहे. साहित्यविषयक उपक्रमांना फाटा देण्यात आला असून त्याऐवजी विधानसभा मतदारसंघाचे कामकाज या इमारतीत सुरू आहे.

लेखक पु. भा. भावे यांच्या स्मृती जपण्यासाठी १९९५ मध्ये पालिकेची निवडणूक झाल्यानंतर समाजकल्याण व सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडण्यात आला. त्या वेळी सर्वानी एकमताने हा ठराव संमत केला. शहरात पु. भा. भावे यांच्या नावे व्याख्यानमालाही सुरू करण्यात आली. या व्याख्यानमालेसाठी त्याकाळी ७० हजार रुपयांच्या निधीची तरतूद पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

या तीन दिवसीय या व्याख्यानमालेमध्ये पालिकेच्या वाचनालयात उपलब्ध असलेल्या पु. भा. भावे यांच्या साहित्याचे प्रदर्शनही मांडण्यात येत असे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विठ्ठल कामत, मोहन गोखले यांच्यासारखे विचारवंत या व्याख्यानमालेत सहभागी झाले होते, मात्र २००७ मध्ये ही व्याख्यानमाला बंद पडली. त्यामागचे कारण गुलदस्त्यातच आहे.

सध्या पु. भा. भावे सामाजकल्याण व सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था झाली आहे. डोंबिवली नगरपालिका अस्तित्वात असताना १९८० मध्ये ही इमारत बांधण्यात आली.

या दुमजली इमारतीत सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेची हिंदी भाषिक शाळा चालते. तसेच कल्याण तहसील कार्यालयाचे उपकेंद्रही या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. १९९६-९७ मध्ये या इमारतीला पु. भा. भावे सामाजिक व सांस्कृतिक केंद्र असे नाव देऊन तळमजल्यालावर भावे सभागृह उभारण्यात आले. भावे व्याख्यानमालेचा केवळ शुभारंभच या सभागृहात झाला. त्यानंतर मात्र येथे एकही कार्यक्रम झाला नाही. जागा कमी पडत असल्याने व्याख्यानमाला अन्य एखाद्या सभागृहात घेण्यात येत असे. त्यानंतर मात्र या सभागृहाकडे सर्वानीच पाठ फिरवली.

अस्वच्छतेचा कहर

भावे सभागृहाला भेट देण्यास कुणी आले तर त्याचे स्वागत कचऱ्यानेच होते. ‘येथे कचरा टाकू नये’ असा फलक भाजपच्या लोकप्रतिनिधीने लावला असला तरी तिथे कचरा टाकला जातो. भटकी कुत्री त्यावर नाचून तो इतस्तत: पसरवतात. केंद्राची इमारतही मोडकळीस आली आहे. भिंतींना वाळवी लागली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

कल्याण शहरात सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पु. भा. भावे व्याख्यानमाला चालते. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात चार लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. डोंबिवलीतील व्याख्यानमालेत खंड पडला असून नागरिक अथवा संस्थांनी पुढाकार घेऊन ती पुन्हा सुरू केली पाहिजे. केंद्राच्या इमारतीची जागा ही शासनाची असून ही इमारत जुनी झाली असल्याने तिची पुनर्बाधणी होणेच गरजेचे आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शासनाने ही जागा पालिकेला द्यावी अथवा तिच्या पुनर्बाधणीचे अधिकार द्यावेत. पालिकेच्या अर्थसंकल्पातही आम्ही दुरुस्तीसाठी वेगळा निधी ठेवला आहे.

महापौर राजेंद्र देवळेकर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constituency voting work in pu bha bhave memorial center in dombivali
First published on: 19-10-2016 at 02:46 IST