ठाणे : पर्यावरणपूरक शहर म्हणून नवी मुंबई शहर ओळखले जावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरातील वाढत्या प्रदुषणासंदर्भात उपाययोजना तसेच प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा बचत आणि ग्रीन हाऊस गॅसचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी केंद्र उभारली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यात येणार असून नवी मुंबईत आठ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र कार्यान्वित केले जाणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात अनेक अत्याधुनिक सेवा सुविधांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान शहरात होणार प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक प्रमाणात केला जावे हे उद्दिष्ट समोर ठेवून महापालिकेने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार २०३० पर्यंत देशातील किमान ३० टक्के वाहने इलेक्ट्रिक असावीत, या उद्दिष्टाकडे नवी मुंबई महापालिका सक्रियपणे वाटचाल करत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र उभारली जाणार आहेत. या केंद्रांसाठी रस्त्यालगत, मॉल्स, विभाग कार्यालये, मुख्यालय, मंगल कार्यालये, उद्याने, वाहनतळे अशा सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार शहरात २४ क्लस्टर्समध्ये एकूण १४३ चार्जिंग पॉईंट प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळ एक आणि दोन मध्ये प्रत्येकी चार चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण ४८ चार्जिंग पॉइंट्सचा समावेश आहे. या संबंधित जागा महापालिकेकडून नियुक्त एजन्सींना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रांची उभारणी विविध कंपन्यांकडून केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेला प्रती किलोवॅट ४ रुपये इतके उत्पन्न मिळणार असून, १५ व्या वित्त आयोगांतर्गत ‘मिलीयन प्लस सिटी’ गटातील हवा गुणवत्ता सुधारणा निधीतून २ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
कसे असणार चार्जिंग केंद्र
चार्जिंग केंद्र परिसरात जाहिरातीसाठी मोकळी जागा, विद्युत रोषणाई आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नात महापालिकेलाही हिस्सा दिला जाणार आहे. तसेच, महापालिकेच्या परवानगीने या ठिकाणी खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या विक्रीसाठी किऑस्क उभारण्याची मुभा दिली जाणार आहे.
