कल्याण – कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभाग हद्दीत बैलबाजार भागात एका सहा माळ्याच्या गृहसंकुलाची बनावट सुधारित बांधकाम परवानगी तयार करून या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाची फसवणूक केल्या बद्दल पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी एका भूमाफिया विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

सलमान अनिस डोलारे (४२), रा. मरियम टाॅवर, दूधनाका, कल्याण) असे गुन्हा दाखल भूमाफियाचे नाव आहे. कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सलमान डोलारे यांच्या विरुध्द भारतीय दंड संहितेच्या १८६० चे कलम ४२०, ४६७, ४६-५, ४६८, ४७-१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या वर्षभरात सलामन डोलारे या भूमाफिया विरुध्द घर खरेदीत फसवणूक झाली म्हणून बाजारपेठ पोलीस ठाण्यात पालिका सेवेतील एक कर्मचारी आणि इतर, तसेच, पालिकेच्या बगिचा, उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारली म्हणून गेल्या वर्षी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांनी सुरू केला होता. परंतु, या गुन्ह्यांचा तपास नंतर ठाणे गुन्हे शाखेकडे गेल्या वर्षी वर्ग करण्यात आला.

सलमान डोलारे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या भागात बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. या प्रकरणांचा तपास सुरू असताना आता एका बेकायदा इमारतीचे सुधारित बांधकाम परवानगीचे डोलारे यांचे प्रकरण उघडकीला आले आहे. पालिकेच्या क प्रभाग कार्यालयानेही गेल्या वर्षी सलमान डोलारे भूमाफिया विरुध्द आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारतीची उभारणी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या कल्याण पश्चिममधील क प्रभाग कार्यालयाच्या माध्यमातून सन २०२३ करण्यात आलेला हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला आहे.

पालिकेच्या नगररचनाकाराने बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सन २०२३ मध्ये बैलबाजार मधील एका नवीन इमारतीच्या बांधकाम संदर्भातील सुधारित बांधकाम परवानगीची कागदपत्रे बांधकामधारक सलमान डोलारे यांनी क प्रभाग कार्यालयात दाखल केली होती. या कागदपत्रांवर पालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिलेला कडोंमपा, नरवि, कवि, ३७१३-१३-६१-३२६, ६ मार्च २०२३ असा क्रमांक आणि तारीख होती. स्टिल्ट, पहिला ते सहावा माळा अशा रचनेच्या इमारतीची ही सुधारित बांधकाम परवानगी होती.

क प्रभाग कार्यालयात ही कागदपत्रे दाखल झाल्यावर तत्कालीन अधिकाऱ्याने ही कागदपत्रे सत्यता पडताळणीसाठी पालिकेच्या नगररचना विभागाकडे पाठविली. त्यावेळी या सुधारित बांधकाम परवानगीच्या कागदपत्रांवरील परवानगीचा मंजुरी क्रमांक नगररनचा विभागातील अभिलेखात उपलब्ध नव्हता.अशाप्रकारची कोणतीही सुधारित बांधकाम परवानगी पालिकेने सलमान डालोरे यांना दिली नसल्याचे नगररचना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

सलमान डालोरे यांनी सुधारित बांधकाम परवानगीची कागदपत्रे तयार करून त्या माध्यमातून पालिका आणि शासनाची फसवणूक केली म्हणून नगररचना अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सलमान डोलारेंविरुध्द फसवणुकीचा गु्न्हा पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.