गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून उल्हासनगरच्या परिमंडळ चारमध्ये जुगार जोमाने सुरू असल्याचे दिसून आले आहे. उल्हासनगर पोलिसांनी गेल्या तीन दिवसात जुगार प्रतिबंध कायद्याखाली 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या नावाखाली खेळला जाणारा हा जुगार गणेश मंडप आणि गणपतीपासून दूर सुरू आहे. तर ग्रामीण भागातही जुगार जोरात सुरू असल्याचे कळते आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण या तालुक्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शहरी भागासह ग्रामीण भागातील या उत्सवाचं प्रमुख आकर्षण येथे छुप्या पद्धतीने खेळवला जाणारा जुगार हाच असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. मोठ्या व्यक्ती आपली शेतघरे, बंगले या जुगारासाठी खुले करत असल्याचे यापूर्वीच्या काही घटनांमध्ये दिसून आले आहे. गेल्या वर्षी अंबरनाथ पूर्व भागात एका बांधकाम व्यवसायिकाच्या शेतघरावर मुंबई पोलिसांनी छापा मारून अशाच प्रकारे मोठा जुगार उधळून लावला होता. यात लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तर अनेकांना अटकही करण्यात आली होती.

हेही वाचा : ठाण्यात गणेश मुर्ती विसर्जनासाठी भक्तांना टोकदार दगड आणि खड्यातून काढावी लागते वाट

त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. गेल्या वर्षी झालेल्या या कारवाईनंतर यांना जुगाराचे प्रमाण घटेल, अशी आशा होती. मात्र गेल्या तीन दिवसात परिमंडळ 4 मध्ये दोन ठिकाणी झालेल्या कारवाई 39 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या दोन्ही प्रकरणांचा उलगडा झाला. एका प्रकरणात नेहरू चौकाजवळच्या एका बंदिस्त खोलीत हा जुगार सुरू होता. यात 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाण्यात कृत्रिम तलावात बुडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसऱ्या प्रकरणात कॅम्प एक भागात शहाड स्थानकाजवळ एका दुचाकी वाहनतळाच्या वास्तूत पहिल्या मजल्यावर जुगार सुरू होता. या प्रकरणात सात जणांवर जुगार खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही ठिकाणी गणेश मंडप आणि गणेश मूर्ती दूर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव हे जुगारासाठी एक निमित्त असल्याचे या घटनांमधून दिसून येते आहे.