डोंबिवली : आतापर्यंत डोंबिवली शहराच्या ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, एमआयडीसी परिसरात दुचाकीवरून येऊन पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या लुटारूंनी आपला म्होरा डोंबिवली जवळील २७ गाव परिसराकडे वळविला आहे. २७ गाव परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. सकाळ, संध्याकाळ नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. कामावर जातात. अशा पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा किमती ऐवज हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

गेल्या दहा दिवसापूर्वी आजदे गाव हद्दीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची ६० हजार रूपये किमतीची साखळी चोरट्यांनी चोरून नेली होती. ९० फुटी रस्ता भागात चामुंडा सोसायटी परिसरात एका वृध्देच्या गळ्यातील सोन्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेली होती. या गुन्हे प्रकरणातील चोरटे मानपाडा पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केले आहेत.

अशाप्रकारे पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरणारी एक आंतरराज्य टोळी कल्याण, डोंबिवलीच्या पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील महत्वाचे म्होरके पोलीस जाळ्यात अडकले तरी त्यांची नवीन पैदास होत असल्याने पादचारी संतप्त होत आहेत. एका टोळीतील महत्वाचे म्होरके पोलिसांनी पकडल्यावर किमान आता तरी दुचाकीवरून येणाऱ्या लुटारूंची दहशत थांबेल असे वाटत असतानाच, तात्काळ काही दिवसात पुन्हा लुटीचे नवीन प्रकार नवीन भागात सुरू होत आहेत. २७ गाव भागात असे दुचाकीवरून येणारे लुटारू स्थानिक ग्रामस्थांच्या तावडीत लूट करताना सापडले तर मात्र त्यांना ग्रामस्थांकडून बेदम प्रसाद दिला जाण्याची शक्यता आहे. २७ गाव भागात पळण्यासाठी गावातून एक ते दोन रस्ते असतात. त्यामुळे गाव हद्दीत या चोरट्यांनी लूट केली तर त्यांना कोंडून पकडून आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

विघ्नेश चंद्रकांत कुडाळकर (४३) हे डोंबिवली पूर्वेतील भोपर गाव भागात कुटुंबीयांसह राहतात. ते नोकरदार आहेत. शनिवारी संध्याकाळी विघ्ननेश आणि त्यांची मुलगी माऊली असे दोघे किराणा दुकानातील सामान, भाजीपाला घेऊन पायी घरी चालले होते. विघ्नेश यांच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. विघ्नेश यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावर दोनजण बसले होते. ते पुढे जातील असे वाटत असतानाच अचानक त्यांनी दुचाकी विघ्नेश आणि त्यांच्या मुलीच्या अंगावर घातली. दोघेही घाबरले.

तेवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका इसमाने विघ्नेश यांच्या मानेवर जोराचा फटका मारला. त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. दोन्ही हातात पिशव्या असल्याने त्या वेळेत विघ्नेश यांना जोराचा प्रतिकार करता आला नाही. विघ्नेश यांनी पिशव्या खाली ठेऊन चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका चोरट्याने दुचाकी स्वाराला वेगान दुचाकी पळव असे बोलत दुचाकी भोपर मधील गजानन चौकाच्या दिशेने नेऊन ते पळून गेले.

विघ्नेश कुडाळकर यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण तपास करत आहेत.