डोंबिवली : डोंबिवलीतील एका सोळा वर्षाच्या मुलाचे पूर्ववैमनस्यातून अपहरण चार जणांनी केले. या मुलाला एका मोटारीत जबरदस्तीने बसवून त्याला डोंबिवली जवळील भोपर परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला बेदम मारहाण करून त्याच्या सर्वांगावर चाकूने वार करण्यात आले. यापुढे आमच्या वाटेला गेल्यास तर तुझ्या वडिलांना पण सोडणार नाही अशी धमकी देत हल्लेखोर पळून गेले.
सोमवारी रात्री हा प्रकार डोंबिवली जवळी भोपर गाव हद्दीत घडला आहे. या अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. २० त २३ वयोगटातील हे हल्लेखोर आहेत. या प्रकरणातील दोन हल्लेखोर तरूण हे डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर मधील एका सुस्थितीत घरातील आहेत. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की डोंबिवली भोपर गाव हद्दीत राहणारा एका सोळा वर्षाच्या मुलाचा सुनीलनगरमध्ये राहत असलेल्या एका तरूणा बरोबर वाद झाला होता. या वादावरून सुनीलनगरमधील तरूणाच्या मनात तक्रारदार बालकाविषयी राग होता. तो तक्रारदार तरूणाला धडा शिकविण्याच्या तयारीत होता.
सोमवारी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार अल्पवयीन बालक आपल्या घर परिसरातील खासगी शिकवणी वर्गात गेला होता. त्याला तहान लागल्याने तो पाणी पिण्यासाठी शिकवणी वर्गाच्या बाहेर येऊन तळ मजल्याला आला. ती संधी साधत त्याच्या हालचालीवर पाळत ठेऊन असलेल्या सुनीलनगरमधील तरूणासह इतर तीन तरूणांनी तक्रारदार बालकाला जबरदस्तीने चार तरूणांनी जबरदस्तीने एका मोटारीत बसविले. मोटारीत बसवत असताना बालकाने बचावासाठी जोरदार ओरडा केला. पण कोणीही मदतीला आले नाही.
चारही तरूणांनी बालकाने ओरडा करताच त्याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला जबरदस्तीने मोटारीत बसविले. त्याला शिळफाटा रस्ता भागातील भोपर रस्त्याने तीन किलोमीटर दूर अंतरावर रात्रीच्या वेळेत नेले. तेथे बालकाला मोटारीतून खाली उतरविण्यात आले. त्याला शिवागीळ करत बेदम मारहाण करण्यात आली. एका तरूणाने बालकाच्या अंगावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. पुन्हा तू आमच्या वाटेला गेलास तर तुझ्या वडिलांना पण सोडणार नाही, अशी धमकी या तरूणांनी बालकाला दिली. त्यानंतर चारही तरूणांनी बालकाला पुन्हा मोटारीत घेऊन त्याला मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट भागात सोडून दिले. तेथून चारही जण पळून गेले.
बालकाने पायी चालत घर गाठले. घरी त्यांनी घडला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. सुनीलनगर मधील तरूणासह इतर तीन जणांवर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश भाबड तपास करत आहेत.