डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारची खारफुटीची जुनाट झाडे तोडून खाडी पात्रात मातीचे भराव करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू आहे. काही स्थानिक ग्रामस्थ, भूमाफियांच्या संगनमताने ही भरावाची कामे करत आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. खारफुटीचे जंगल तोडून मातीचा भराव करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक याविषयी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
मातीचा भराव करणाऱ्या भूमाफियांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने कोणीही स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी नागरिक याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये देवीचापाडा खाडी किनारी भागात जेट्टीजवळ खारफुटीची झाडे तोडून मातीचे भराव टाकण्याचे काम भूमाफियांकडून केले होते. यावेळी काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेऊन कल्याण डोंबिवली पालिका अधिकारी, कांदळवन विभाग, वन विभाग, महसूल विभागाला याविषयीची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर भराव करणारे भूमाफिया गायब झाले.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करून देवीचापाडा येथील खाडीत मातीचा भराव केल्याप्रकरणी अज्ञात इसमांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पर्यावरण संवर्धन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. महिनाभरापासून डम्परद्वारे माती आणून हे भराव केले जात आहेत. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी येणारे नागरिक हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होत आहेत. यापूर्वी याच जागेवर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी खारफुटीची लागवड केली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले आहेत. ही नव्याने उगवण झालेली झाडे या मातीच्या भरावाखाली गाडण्यात आली आहेत. जुनाट झाडे भरावाला अडथळा येत असल्याने तोडून टाकण्यात आली आहेत.
देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, कोपर, मोठागाव, रेतीबंदर, गणेशघाट परिसर हा डोंबिवली पश्चिमेतील खाडी किनारचा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. उर्वरित भाग वाळू माफिया, चाळ माफियांनी भराव करून हडप केले आहेत. देवीचापाडा येथील पाणउताराच्या (जेट्टी) दोन्ही बाजुला, खाडी किनारच्या अंत्येष्टी विधीच्या घाटाच्या बाजुला भराव करून हा संपूर्ण परिसर मैदानासारखा समतल करण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या खाडी किनारा बुजवून भराव टाकण्याची कामे सुरू असताना ती पालिका, पोलीस, महसूल अधिकाऱ्यांना दिसत नसल्याबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. देवीचापाडा येथील काही जागरूक नागरिकांनी काही वर्षापूर्वी महसूल विभागाला पत्र देऊन खाडी किनारा भागात भराव होऊ नयेत आणि खारफुटीच्या संवर्धनासाठी पत्रे दिली आहेत. पण त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येते.
डोंबिवली देवीचापाडा येथे कोणीही खारफुटी तोडून खाडी पात्रात मातीचा भराव करत असेल तर याप्रकरणाची तातडीने पाहणी, चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. – सचिन शेजाळ,तहसीलदार,कल्याण.
देवीचापाडा येथे मातीचा भराव करून तेथे कोणाला बांधकामासाठी परवानगी दिली आहे का याची माहिती घेतो. भरावाचे काम नियमबाह्य असेल तर संबंधितांवर कारवाई करतो. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग.