डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा भागात एका पावडर वेष्टन कारखान्यात पावडर वेष्टन यंत्रातील विजेचा शाॅक लागून एका कामगार महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अक्षता अजय जाधव (४५) असे मृत कामगार महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवलीतील सोनारपाडा भागातील कृष्णावाडी भागात कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. या कंपनीत काम करणाऱ्या अमृत वाघमारे यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाची माहिती घेऊन अपघाताची मृत्युची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सोनारपाडा येथे सद्गुरू कोटिंग कारखाना आहे. अनेक महिला या ठिकाणी काम करतात. यंत्रसामुग्री असल्याने सुरक्षेच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना याठिकाणी आहेत. गुरूवारी नेहमीप्रमाणे मृत अक्षता जाधव आपल्या सहकारी महिला कामगारांच्या सोबत पावडर वेष्टनाचे काम कंपनीतील सयंत्राच्या साहाय्याने करत होत्या. हे काम करत असताना त्यांना अचानक सयंत्रातून आलेल्या विद्युत प्रवाहाचा जोराने शाॅक लागला.
त्या बेशुध्द झाल्या. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी अमृता जाधव यांना तपासले. त्यांची हालचाल पूर्ण थंडावली असल्याने त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.