डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका भागातील पाथर्ली स्मशानभूमी भागात स्वीट ड्रीमच्या पाठीमागील भागात गाळा क्रमांक एक मध्ये काही इसम अंदर बाहर नावाचा ५२ पानी पत्त्यांचा जुगार खेळत आहेत अशी माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना मिळाली. पोलीस पथकाने मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान या जुगार अड्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या जुगार अड्ड्यावरून अकरा हजाराची रक्कम जप्त केली.

गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राहावी, कोणीही कोठे घातक शस्त्रांचा वापर करू नये. जुगार अड्डे बंद राहावेत. शांतता बिघडवू नये यादृष्टीने कल्याण, डोंबिवलीत पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. पोलीस यादृष्टीने प्रयत्नशील असताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत शेलार नाका भागात पाथर्ली स्मशानभूमीजवळील स्वीट ड्रीमच्या पाठीमागील गाळ्यात काही जण अंदर बाहर नावाचा ५२ पानी पत्त्याचा जुगार खेळ खेळत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली.

ही माहिती तात्काळ वरिष्ठ निरीक्षक कदम यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक गणगे, उपनिरीक्षक बुनगे, हवालदार कानडे, नागेश्वर लगस यांना दिली. पोलीस पथकाने तात्काळ दोन पंच तयार केले. मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्ली स्मशानभूमीजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. गाळ्याचा दरवाजा आतून बंद होता. तो उघडण्यात आला. त्यावेळी एका टेबलावर ५२ पानी पत्ते पडले होते. बाजुला पैसे होते. आजुबाजुला चार जण बसले होते. अंदर बाहर नावाचा जुगार हे जुगारी खेळत असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी विचारणा केल्यावर जुगार खेळणाऱ्यांनी आपली नावे पोलिसांना सांंगितले. या जुगार अड्ड्यावर अमोल रमेश कसबे (३४) रा. इंदिरानगर, शेलारनाका, डोंबिवली पूर्व, रमेश श्रीवसंत चव्हाण (३४), रा. गंगाराम शेलार चाळ, खंंबाळपाडा, सर्जेराव योगिराज खिल्लारे (४७) रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, राजूनगर, दयानंद पांडुरंग जाधव (२५) रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलारनाका, डोंंबिवली पूर्व हे जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या जुगार खेळणाऱ्यांची अंगझडती घेतली. त्यांच्या जवळून भारतीय चलनातील पाचशे आणि शंभर अशा एकूण अकरा हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्या. प्रतिबंध असताना या चार जुगारींनी नियमबाह्य पध्दतीने ५२ पानी पत्त्यावर अंदर बाहर नावाचा जुगार खेळला. त्यामुळे त्यांच्या विरूध्द हवालदार नागेश्वर लगस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.