डोंबिवली – डोंंबिवली पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या फ प्रभाग हद्दीत विविध रस्ते, गल्लीबोळात, बाजारपेठेत पालिकेच्या परवानग्या न घेता वीजेचे खांब, इमारतींना लावण्यात आलेल्या बेकायदा फलकांवर फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाई सुरू केली आहे. हे फलक लावणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर पोलीस ठाण्यात मालमत्ता, शहर विद्रुपीकरणाचे फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत.
शहरातील अनेक खासगी शिकवणी चालक, योग वर्ग, लहान व्यावसायिक, व्यापारी आपल्या दुकान, आस्थापनाची जाहिरात करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गल्लीबोळात, बाजारपेठा, रेल्वे स्थानक भागात जाहिरात फलक लावतात. अशाप्रकारचे फलक डोंबिवली पूर्व फ प्रभाग हद्दीत अधिक प्रमाणात लावण्यात येत असल्याचे साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या निदर्शनास आले. पालिकेची परवानी न घेता शहराचे विद्रुपीकरण करतील अशाप्रकारचे फलक, होर्डिंग्ज यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेश आहेत.
फ प्रभाग हद्दीतील अनेक रस्त्यांवर विनापरवानगी फलक, होर्डिंग्ज लावल्याचे निदर्शनास आल्यावर सोमवारी सकाळी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथकातील कामगार घेऊन फ प्रभाग हद्दीत लावण्यात आलेले बेकायदा फलक काढण्याची मोहीम सुरू केली. या फलकांवरील नावे, त्यांचे संपर्क क्रमांक पालिका दप्तरात फौजदारी कारवाईसाठी नोंद करण्यात आले. या कारवाईच्यावेळी अधीक्षक जयवंत चौधरी, वरिष्ठ लिपिक शिरीष भोईर उपस्थित होते.
पाऊस सुरू असताना कारवाई पथकाने फ प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील विनापरवानगी फलक काढून टाकले. हे सर्व फलक पालिकेच्या विभागीय कार्यालयातील आवारात आणून ठेवण्यात आले आहेत. या फलकांवरील आस्थापनांची नावे पाहून त्यांच्यावर महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियमाने टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झालेल्या आस्थापनांमध्ये ॲक्टिव्ह योगा, टिनी स्टार पर स्कूल, हाॅटेल स्वागत, के. आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालय यांचा समावेश आहे.
येत्या आठवडाभर ही फलक हटाव मोहीम फ प्रभागाकडून विभागवार राबवली जाणार आहे. गोग्रासवाडी, पाथर्ली, टिळकनगर, ९० फुटी रस्ता, खंबाळपाडा, ठाकुर्ली, चोळे, भोईरवाडी, नेहरू रस्ता भागात लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.
अनेक आस्थापना चालक, व्यावसायिक रात्रीच्या वेळेत विनापरवानगी फलक शहराच्या विविध भागात लावतात. असे पालिकेची परवानगी न घेता फलक लावणाऱ्यांवर यापुढे मालमत्ता विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करून संबंधितांना कायद्याने शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फ प्रभागात बेकायदा फलक हटाव मोहीम सुरू केली आहे. – हेमा मुंबरकर (साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.)