डोंबिवली – डोंबिवली पूर्व आयरे टावरीपाडा भागातील समर्थ काॅम्पलेक्स या बेकायदा इमारतीवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन वेगळ्या याचिकांमध्ये ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. अशाच पध्दतीने डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील साई रेसिडेन्सी ही बेकायदा इमारत हरेष म्हात्रे यांच्या डोंबिवली पश्चिमेतील सरकारी, आरक्षित भूखंडावरील १४ बेकायदा इमारतींच्या उच्च न्यायालयातील याचिकेत समाविष्ट आहे.
पालिकेने प्राथमिक शाळेच्या आरक्षणावरील साई रेसिडेन्सी बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले असले तरी उच्च न्यायालयाचीही या बेकायदा इमारतीवर टांगती तलवार कायम असणार आहे.
डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या ३४८ क्रमांकाच्या भूखंडावर सात माळ्याची बेकायदा इमारत जमीन मालक धर्मा हेंदऱ्या पाटील, डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमध्ये सहभाग असलेले वास्तुशिल्पकार गोल्डन डायमेंशन, कुलमुखत्यारधारक मृत्युंजय राय (नगरसेवकाचा खासगी अंगरक्षक) यांनी करोना महासाथीच्या काळात बनावट कागदपत्रे, पालिकेच्या बनावट बांधकाम कागदपत्रांचा आधार घेऊन उभारली आहे.
साई रेसिडेन्सी या बेकायदा इमारतींंमधील ५६ सदनिका आणि दोन गाळे ही इमारत अधिकृत आहे असे भासवून या भूमाफियांनी घर खरेदीदारांना विकल्या आहेत. पालिकेच्या आरक्षित भूखंडावर साई रेसिडेन्सी बेकायदा इमारत एका नगरसेवकाच्या खासगी अंगरक्षकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारल्याने कुंभारखाण पाड्यातील रहिवासी मयूर बाळकृष्ण म्हात्रे यांनी साई रेसिडेन्सी बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी गेल्या तीन महिन्यात भूमाफिया, रहिवासी आणि तक्रारदार यांच्या सुनावण्या घेतल्या. या सुनावणीच्या काळात भूमाफिया, रहिवासी साई रेसिडेन्सी इमारतीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे पालिकेला दाखवू शकले नाहीत. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी साई रेसिडेन्सी इमारत अनधिकृत घोषित करून जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी याचिकाकर्ते हरेष म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेतील सरकारी जमिनी, पालिकेच्या आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी उभारलेल्या १४ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठीची याचिका मुंंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या १४ बेकायदा इमारतींमध्ये साई रेसिडेन्सी या बेकायदा इमारतीचा समावेश आहे.
न्यायालयाने याचिकाकर्ते हरेष म्हात्रे यांना प्रथम या १४ बेकायदा इमारतींच्या तक्रारी आपण कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडे करा. पालिकेने कारवाई केली नाही तर मग तुम्ही आमच्याकडे या, असे सूचित केले आहे. पालिकेने या इमारतींवर कारवाई न केल्याने आपण १४ बेकायदा इमारतींचा विषय घेऊन पालिके विरुध्द याचिका दाखल करणार आहोत, असे याचिकाकर्ते हरेष म्हात्रे यांनी सांगितले.
ही इमारत उभारणारा मुख्य सूत्रधार असलेला एक लोकप्रतिनिधी मात्र आता गुपचिळी धरून दडी मारून बसला असल्याची चर्चा आहे. साई रेसिडेन्सी इमारत भुईसपाट केल्याशिवाय आणि या इमारत प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू होऊन दोषींना कठोर शिक्षा झाल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा तक्रारदार मयूर म्हात्रे यांनी दिला आहे.