Ganeshotsav 2025: डोंबिवली – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी समर्थक आमदार राजेश मोरे यांच्यासह दीपेश म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. या गणपती दर्शन राजनितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. चार प्रभागांचा एक प्रभाग असणार आहे. या चार प्रभागांंमधून एक गठ्ठा आपले उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप, शिंदे शिवसेनेने डोंबिवली, कल्याणमध्ये जोरदार कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. भाजपने पालिकेवर आपला झेंडा फडकविण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.

शहरातील महत्वाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आपल्या पक्षात असावेत यासाठी भाजप, शिंदे शिवसेना विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार पक्ष प्रवेशाच्या मोहिमा राबवित आहेत. अलीकडेच खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सध्या भाजप मुक्कामी असलेले भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांची डोंबिवलीतील त्यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनाचे निमित्त साधून भेट घेतली. आमदार राजेश मोरेही त्यांची भेट घेऊन आले आहेत.

माजी नगरसेवक विकास म्हात्रे आता भाजपमध्ये असले तरी नाराज असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. विकास म्हात्रे यांचे दोन प्रभाग आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर नाराज विकास यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदे शिवसेना गुप्तपणे जोरदार व्यूहरचना आखत असल्याची चर्चा आहे.

या सर्व घडामोडी सुरू असताना खासदार शिंदे यांनी मंगळवारी दीपेश म्हात्रे यांच्या मोठागाव येथील नवनाथ बंगल्यावर जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी खासदारांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चहाचा आग्रह त्यानंतर, त्यांना सुकामेवा देऊन पाहुणचार केला. डोंबिवली विधानसभेची उमेदवारी मिळत नाही हे जाणवल्यावर गेल्या वर्षी दीपेश म्हात्रे यांनी शिंंदे शिवसेनेतून ठाकरे गटात प्रवेश केला होता. या पक्षातून भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरुध्द निवडणूक लढवली होती.

शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर प्रथमच दीपेश म्हात्रे आणि डाॅ. श्रीकांत शिंदे यांची गणपती दर्शनानिमित्त गळाभेट झाली. यावेळी कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे दीपेश म्हात्रे समर्थकांनी सांगितले. यावेळी खासदारांसोबत उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, राजन मराठे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.