डोंबिवली – लग्नाचे आमिष दाखवून ठाणे आणि डोंबिवलीतील दोन इसमांनी डोंबिवलीत कुटुंबीयांसह राहत असलेल्या दोन महिलांची एकूण एक कोटी ५६ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या फसवणूक प्रकरणात एक महिला ३० वर्षाची, एक महिला ४४ वर्षाची आहे. ४४ वर्षाची महिला पंजाबी असलेल्या पतीशी न पटल्याने पतीपासून आपल्या मुलासह विभक्त आपल्या डोंबिवली पश्चिमेतील आईच्या घरी राहते. ४४ वर्षाच्या महिलेने कुटुंबीयांच्या सहमतीने पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. पीडित महिलेने जीवनसाथी या विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली. संकेतस्थळावरील नोंदणीतून अनिल अजित दातार यांनी पीडित महिलेशी संवाद साधला. आपण विवाहासाठी इच्छुक असल्याचे कळविले.

अनिल दातार हे डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील विजया बँकेसमोरील सोसायटीत राहतात. पीडित महिलेच्या कुटुंबीयांना अनिलचा स्वभाव पटला. आपला व्यवसाय आहे, असे अनिल यांनी पीडित महिलेला सांगितले. अनुरूप पती मिळतो म्हणून पीडितेने अनिलशी बोलणे सुरू ठेवले. पीडिता आणि अनिल यांच्याशी विवाहाविषयी बोलणी सुरू झाली. अनिलने आपला पहिला विवाह झाला आहे. घटस्फोट झाला की आपण तात्काळ विवाह करू असे आश्वासन दिले.

या प्रकारानंतर अनिलने घटस्फोटाच्या प्रक्रिया पार पडण्यासाठी, पीडितेच्या भावाला नोकरी लावण्यासाठी, दिल्लीतील आपल्या सहकाऱ्याला आलेली आर्थिक अडचण अशी विविध कारणे सांगून पीडित महिला, तिचे कुटुंब नातेवाईक यांच्याकडून सन २०२३ ते जून २०२५ या कालावधीत एकूण ६२ लाख ७५ हजार रूपये उकळले.

पीडित महिलेने अनिल दातारवर विश्वास ठेऊन घरातील सर्व पैसे अनिलच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले. सोन्याचे दागिने गहाण ठेवले. पीडित महिलेच्या कुटुंबांवर हलाखीची वेळ आली. अनिल दातार यांनी आपणास दिल्ली येथे नोकरी लागली आहे. आपण चेन्नई येथे कामासाठी जात आहोत अशी कारणे देऊन पीडित कुटुंबाला टाळणे सुरू केले. अनिल आपली फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर पीडितेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

इन्टाग्रामची ओळख महागात

इन्टाग्रामवरील ओळखीतून ठाणे येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील ३० वर्षाच्या तरूणाने डोंबिवलीतील ३० वर्षाच्या तरूणीशी लग्नाचे आमिष दाखवून ९२ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. पीडितेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे. शैलेश प्रकाश रामगुडे (३०) असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. तो ठाणे पश्चिमेतील हिरानंदानी इस्टेटमधील साॅलिटर इमारतीत राहतो. सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

शैलेश याने पीडित तरूणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आपल्या घरावर ईडीची धाड पडली आहे. घरातील दोन किलो सोने, एक कोटी रूपये ईडीने जप्त केले आहेत. ते सोडविण्यासाठी शैलेशने पीडितेकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ९२ लाख ७५ हजार रूपयांचा ऐवज उकळला. त्यानंतर लग्न न करता, पैसे परत न करता पीडितेची फसवणूक केली आहे. पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे तपास करत आहेत.